मुंबई: राज्य परिवहन महामंडळानंतर आता दिवाळीच्या गर्दीचा हंगाम लक्षात घेता खासगी बस वाहतूकदारांना सुद्धा 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी खासगी बस वाहतुकदारांना केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1989 च्या नियम 20 (1) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनांच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलतांना तसेच प्रवाशांच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.
बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बस मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे, तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावे. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी एखाद्या प्रवाशास ताप , सर्दी, खोकला, अशा प्रकारचे कोविड 19 चे प्राथमिक लक्षण दिसत असल्यास अशा प्रवाशांना बस मधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.
इतरही महत्वाचे.