Advertisement

वाढदिवसाच्या निमित्ताने लख्ख प्रकाशाने उजळले संपूर्ण गाव

प्रजापत्र | Saturday, 27/08/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२७ (प्रतिनिधी)-भव्यदिव्य जन्मदिवस साजरा करण्याची हल्ली क्रेझ आहे. मोठा केक, धमाल पार्टी, आऊटींग असे वेगवेगळे फंडे तरुणाई करत असते. मात्र, यासर्वात सामाजिक बांधिलकी जपत जन्मदिवस कमीच पाहायला मिळतात. असाच वेगळा वाढदिवस माजलगाव तालुक्यात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्याचा वसा जोपासत नाखलगाव येथील एका तरुणाने पुतण्याच्या जन्मदिनी अख्ख्या गावात महागड्या एलईडी लाईट्स बसवत गावाला अंधारापासून प्रकाशात आणले आहे. गावासाठी काहीतरी देणे लागते या विचारातून राबवलेल्या या अभिनव उपक्रमाची चांगलीच चर्चा सुरु आहे.  

 

     माजलगाव तालुक्यातील नाखलगाव येथील तरुणाचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत ग्रामस्थांची चांगलीच लक्षात राहणारी ठरत आहे. तसे हे गाव विविध उपक्रमासाठी सतत चर्चेत असते. परंतु, झाले असे की, गावात मागील तीन वर्षांपासून स्ट्रीट लाईट्स नाहीत. स्ट्रीट लाईट्स नसल्याने रात्री अनेक अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते. हीच अडचण दूर करण्याचा विचार सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रमेश झोडगे या तरुणाच्या डोक्यात सुरु होता.काही दिवसांपूर्वी रमेशने आर्थिक गणित मांडले अन पुतण्या सुहासच्या जन्मदिवशी अख्ख्या गावात थेट एलईडी लावले. कुठल्याही सरकारी योजनेची वाट पाहत बसण्यापेक्षा ४८ विद्युत पोलवर त्याने स्वखर्चातून लाईट्स लावले. याला जवळपास १ लाख २५ हजार रुपयांचा खर्च आला. आज सुहासच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून हनुमान मंदिर परिसरात याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पांडुरंग झोडगे, सरपंच विठ्ठल गवळी, रामहरी शिनगारे, लक्ष्मण सोळंके, भागवत शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या एलईडी लाईट्समुळे संपूर्ण गाव प्रकाशमय झाल्याने पंचक्रोशीत झोडगे परिवाराचे कौतुक होत आहे.
 

Advertisement

Advertisement