Advertisement

तलावात गेलेल्या चार वर्षिय चिमुरडीचा पाण्यात बुडून मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 25/08/2022
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- अतिशय हृदयद्रावक अशा प्रकारची घटना आज (दि.25) सकाळच्या सुमारास परळी -गंगाखेड रस्त्यावरील औष्णिक विद्युत केंद्राचे राख साठवणूक तळे आहे त्या ठिकाणी घडली. या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.

 

 

     राखेच्या तळ्यापासून केवळ शंभर मीटर अंतरावर राहत असलेल्या पवार कुटुंबातील  तीन भावंडं खेळत खेळत  राखेच्या तलावात साचलेल्या डबक्याच्या पाण्यात गेले. त्या ठिकाणी मयत साक्षी व तिची दुसरी बहीण या पाण्याच्या डबक्यात खेळू लागले. खेळता खेळता ते पाण्यात पडले याच ठिकाणी असलेला त्यांचा सात वर्षाचा मोठा भाऊ याने ती घटना बघितली आणि धावत जाऊन त्याने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. साक्षीचे वडील घटनास्थळावर येऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत चार वर्षाची साक्षी या चिमुरडीचा मृत्यू झाला. एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. परळी गंगाखेड रस्त्यावरील पांडे पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस पवार कुटुंब राहते. राखेच्या तळ्या पासून 100 मीटर अंतरावरच त्यांचे घर आहे. सकाळच्या सुमारास ही मुले खेळत खेळत या तळ्यात गेली होती. खेळतानाच दुर्दैवाने या तीन मुलांमधील चार वर्षाची चिमुरडी साक्षी साईनाथ पवार हिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 

Advertisement

Advertisement