बीड दि. २३ (प्रतिनिधी ) : राज्यभरात शेतकरी अतिवृष्टी आणि इतर आपत्तींनी हैराण झालेला आहे. बीड जिल्ह्यातही जून आणि जुलै महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, मात्र आता अतिवृष्टीचा तीन आठवड्यांपेक्षाही अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे या पंचनाम्यांच्यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने नुकतीच अतिवृष्टीग्रस्तांना नवीन दराने मदत देण्याचे आदेश काढले आहेत, त्यासाठी आता नुकसानीचे पंचनामे करून अहवाल पाठविला जाणार आहे. मात्र अतिवृष्टीचा ३ आठवडे उलटल्यानंतर आता काय पंचनामे होणार हा प्रश्न आहेच.
बीड जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात सातत्याने काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण देखील त्या त्या महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक होते . त्यामुळे त्याकाळात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या मंडळांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे त्याचवेळी होणे अपेक्षित होते. मात्र इतके दिवस गप्प असलेल्या प्रशासनाने आता अतिवृष्टीच्या तीन आठवड्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश काढले आहेत.
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे आता सुधारित दरांप्रमाणे नुकसानीच्या अनुदानासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवायचा असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी आता पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी ३३ % अधिक नुकसान झाले आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज कृषी, महसूल विभागासह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
विमा कंपनीने केले ३४७१ सर्व्हे, तर सर्व्हेपूर्वीच फेटाळले २९२३ प्रस्ताव
एकीकडे एसडीआरएफमधून मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासन आता पंचनाम्याची हालचाली करीत आहे, आणि पंचनाम्यांसाठी विमा कंपनीने प्रतिनिधी पाठवावेत असे सांगत आहे. मात्र बीड जिल्ह्यात मागच्या काळात पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडे आतापर्यंत ७८९७ तक्रारी आल्या आहेत . त्यापैकी तब्बल २९२३ प्रकरणे विमा कंपनीने सर्व्हे करण्या अगोदरच फेटाळले आहेत आणि यातील २६४७ प्रकरणे केवळ उशिरा सूचना दिली म्हणून फेटाळण्यात आले आहेत. विमा कंपनीने आतापर्यंत ३४७१ प्रकरणात सर्व्हे पूर्ण केला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन नव्याने उशिरा काय पंचनामे करणार हाच प्रश्न आहे.
चालू महिन्यात तर पावसाने फिरविली पाठ
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा प्रकार जूनच्या शेवटी आणि जुलै महिन्यात अधिक झाला होता. ऑगस्ट महिन्यात तर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याचेच चित्र आहे. ऑगस्टच्या २३ दिवसांपैकी जिल्ह्यात सरासरी ५ इतक्याच पर्जन्य दिवसांची नोंद झाली आहे. पिकांच्या वाढीच्या काळात पडलेला हा ताण देखील आता चिंतेचा विषय आहे.
मागील अनुदानाचे थकले ६१ कोटी
जिल्ह्यात एप्रिल २०२१ ते त जुलै २२ पर्यंत पशुधन, शेती, घरांची पडझड आदींचे जे नुकसान झाले त्या अनुदानाची रक्कम आणखीही मिळालेली नाही. जून ते ऑकटोबर २०२१ मध्ये जमीन खरडून जाणे , अतिवृष्टी यामुळे झालेल्या नुकसानीपोटी तब्बल २८. ८३ कोटींची मागणी करण्यात आली होती, मात्र ते अनुदान अजूनही मिळालेले नाही. मागील वर्षभरातील अनुदानाचे तब्बल ६१ कोटी आजही शासनाकडे थकले आहेत.