बीसीसीआयमध्ये रोहितबाबत राजकारण सुरु आहे का?
टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ अर्थात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने रोहित शर्मा आयपीएलमधील चार सामने खेळला नव्हता. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असावी, असे तर्क काहींनी लावले. मात्र मंगळवारी (03 नोव्हेंबर) आयपीएलच्या (IPL) साखळी फेरीतील शेवटचा सामना (मुंबई विरुद्ध हैदराबाद) खेळण्यासाठी रोहित मैदानावर उतरल्याने रोहितची दुखापत गंभीर नसून तो पूर्णपणे बरा झाल्याचे स्पष्ट झाले, तरीदेखील रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड का झाली नाही? असा सवाल चाहते उपस्थित करु लागले आहेत.
रोहितला भारतीय संघात स्थान का देण्यात आलं नाही, यावरुन भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर, ‘कर्नल’ दिलीप वेंगसरकर, माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग यांनीदेखील सवाल उपस्थित केले आहेत. त्यातच हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदानावर उतरुन रोहितने आपण फिट असल्याची पावती दिली आहे. त्यामुळे बीसीसीआयमध्ये रोहितबाबत राजकारण सुरु आहे का? असा सवाल नेटीझन्स उपस्थित करत आहेत. रोहितच्या एका चाहत्याने ट्विटरवर रोहितच्या दुखापतीची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे.