Advertisement

शेवटच्या श्रावण सोमवारी भाविकांचा उसळला जनसागर!

प्रजापत्र | Monday, 22/08/2022
बातमी शेअर करा

किरण धोंड 

परळी वैजनाथ(प्रतीनिधी):- देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत आज (दि.२२) अखेरच्या श्रावण सोमवारनिमित्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. देशभरातील विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. रविवारपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. पहाटेपासूनच दर्शन रांगांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

 

 

धर्मदर्शन रांगेत कालपासूनच भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती.  तर आज सकाळी यामध्ये मोठी वाढ  झाली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. मोठ्या संख्येने भाविक होणार दाखल होणे अपेक्षित धरून श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली आहे. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी साधारणपणे दीड लाख भाविक भक्तांनी दर्शन घेतल्याचे वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी  सांगितले.

 

 

मंदिर परिसरात बेल-फुलांच्या दुकानावर गर्दी 
महादेवाला बेल अधिक आवडत असल्याने आज बेल-फुलांना प्रचंड मागणी होती. वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बेलाची पाने घेऊन विकण्यासाठी महिला, मुले, मुली आणि पुरुषही थांबले होते. केवळ बेल-फुलांवर हजारोंची उलाढाल झाली.

 

भक्तिमय वातावरण 
हर हर महादेव, बम बम बोले, वैद्यनाथ महाराज की जय, ओम नम: शिवाय या जयघोषाने भक्तांनी परिसर दणाणून सोडला होता. भाविकांच्या गर्दीने वैद्यनाथ नगरी फुलून गेली होती. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो भाविक आल्याने परळीला यात्रेचे स्वरुप आले आहे. दिवसभरात परळी पंचक्रोशीतील भाविकांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातसह मराठवाड्यातील दीड लाखाहून अधिक भाविक प्रभू वैद्यनाथ चरणी नतमस्तक झाले आहेत.

 

Advertisement

Advertisement