Advertisement

आजपासून नाट्यगृहे उघडणार

प्रजापत्र | Thursday, 05/11/2020
बातमी शेअर करा

मुंबई : रंगदेवता आणि रसिकांना विनम्र अभिवादन करून अमुक अमुक प्राॅडक्शन सादर करत आहे तमुक तमुक नाटक.... ही स्वागतिका आता नाट्यगृहांमध्ये रसिकांना ऐकायला मिळणार आहे. रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने ५० टक्के आसनक्षमतेच्या मुख्य नियमावर तसेच इतर काही नियमांवर नाटकांचे पडदे उघडण्याची तिसरी घंटा वाजवली असल्याने आज दि. ५ नोव्हेंबरपासून राज्यभरातील  नाट्यगृहेउघडणार आहेत.   ही आनंदवार्ता असली तरी आता मध्यंतरानंतर रंगणाऱ्या रंगभूमीचा ‘अर्थ’ अर्थात अर्थकारण बदलणार आहे. कमी प्रेक्षक, कमी कामगार, भाडे, वाहतूक, मानधन या सगळ्यांचा विचार करून आता नाटक हाेणार आहे. याविषयी रंगभूमी दिनानिमित्त आणि सरकारच्या स्वागतार्ह निर्णयाबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत, त्यांच्याच शब्दांत... 

हा हाेता पाॅझ : प्राजक्त देशमुख (नाट्य अभिनेता, दिग्दर्शक)

सगळं थांबून गेलं इथपर्यंत ठीक होतं; पण सगळं भांबावून गेलं हाेतं. जिवंत कला आता फक्त आठवणीत राहतील का ? पुन्हा रंगमंचावर याचि देही याचि डोळा अंगावर रोमांच उभा राहील का? प्रयोगानंतर प्रयोगाइतकंच कलाकाराला काय हवंसं असतं तर ते म्हणजे मागे येऊन भेटणारे प्रेक्षक. ते पुन्हा कधी घडेल का? असे असंख्य प्रश्न टोपलीत निपचित पडलेल्या नागासारखे भासू लागले हाेते. भयानक, थंड आणि अनपेक्षित.सगळ्यांचं सगळं चाकोरी सांभाळून सुरू झालं हाेतं. पण नाट्यगृहाचा ब्लॅकआऊट काही सरत नव्हता. दरम्यान, गेले सहा-सात महिने डिजिटल माध्यमात काही नवे प्रयोग पाहायला मिळाले. न्यूयाॅर्क टाइम्समध्ये या डिजिटल नाटकाविषयी एक लेख आला होता त्याचं शीर्षक फार समर्पक होतं. ‘Digital Theater Isn’t Theater. It’s a Way to Mourn Its Absence.’ अनेक कल्पक आणि चांगले डिजिटल प्रयोग झाल्यानंतरही प्रश्न खरा हा हाेता की सगळं सुरळीत झाल्यावरचं नाटक कसं असेल? ‘सगळं सुरळीत होणं’ याची नेमकी व्याख्या काय? कारण (निष्काळजी अपवाद सोडल्यास) मास्क तर आता दैनंदिन जीवनाचा भाग झालाच आहे.

Advertisement

Advertisement