Advertisement

दाईच्या कळा

प्रजापत्र | Thursday, 05/11/2020
बातमी शेअर करा

रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांची अटक सध्या पत्रकारांसाठी नाही, मात्र भाजपसाठी कळीचा प्रश्न बनला आहे. अर्णव गोस्वामी यांना एका वास्तुविशारदाच्या आत्महत्येप्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही अटक कोणत्याही प्रकारे माध्यमाशी संबंधित कृतीमुळे झालेली नाही.एखाद्या वाहिनीचा स्टुडिओ बनविण्यासाठी एका वस्तू विशारदाचे ४०० ते ५०० कामगार सातत्याने झटतात आणि त्यानंतर त्या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ होते आणि त्यातून एका तरुणाला आपला जीव द्यावा लागतो, त्या धक्क्याने त्याची आई आत्महत्या करते, हे सारेच आक्रीत आहे. अशी आत्महत्या जर एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांमुळे घडली असती तर याच अर्णव गोस्वामींनी आकाश पाताळ एक केले असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आजची अटक माध्यमांची गळचेपी आहे असे म्हणता येणार नाही. माध्यमातले व्यक्ती आहोत म्हणून काही विशेषाधिकार आहेत असा जो समाज काही लोकांनी करून घेतला आहे, त्याला देखील हे उत्तर आहे. मुळात एखाद्याचे आर्थिक शोषण करण्याचे किंवा एखाद्याला मी मरणाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याचे समर्थन कसे करायचे ? माध्यमांसमोर हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच अर्णवच्या अटकेविरोधात माध्यम जगत शांत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने तर आम्ही याचा निषेध करणार नाही हे देखील स्पष्ट केले आहे. मुळात अर्णव गोस्वामी या व्यक्तीच्या पत्रकारितेबद्दलच अनेक आक्षेप आहेत, मात्र त्या पद्धतीची चर्चा काही काळ बाजूला ठेवली तरी माध्यम हाताशी आहे म्हणून मनमानी करण्याची मुभा कोणाला द्यायची का ? मुळात हे प्रकरण दोन वर्षापूर्वीचे आहे, खरे तर एखाद्या मराठी तरुणाला मरणाच्या दाढेत ढकलण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचवेळी कारवाई करायला हवी होती, पण सत्तेच्या लाडक्यांना दुखाविण्याची हिंमत आपले पोलीस सहसा दाखवित नाहीत, पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर कदाचित एका तरुणाचा मृत्यु देखील झाला नसता.पण त्यावेळी पोलीस गप्प राहिले. पण म्हणून पोलिसांनी आता देखील कारवाईच करायची नाही असे कोणालाच म्हणता येणार नाही. म्हणूनच आज माध्यमातील कोणताच संवेदनशील व्यक्ती अर्णवच्या बाजूने उभा राहू शकत नाही. व्यक्तिगत विषयाला माध्यम स्वातंत्र्याशी जोडले गेले तर अगोदरच डळमळीत होत असलेला माध्यमांवरचा सामान्यांचा विश्वास अधिकच उडून जाईल हे वास्तव आहे.
कायदा सर्वांसाठी आहे, आणि सर्वांना सारखा आहे. अर्णव गोस्वामीला पोलिसांनी चौकशीच्या नोटीस बजावल्या होत्या,पण मी पोलिसांशी बोलणारच नाही, हा अहंकार कशासाठी? ही मस्ती येते कोठून ? आणि अशी मस्ती सहन केली गेली तर उद्या कोणीही असेच वागेल.मध्यम क्षेत्रातील व्यक्ती म्हणून जेव्हा आपण सर्व जगाला शहाणपण शिकवत असतो, त्यावेळी चांगले वागण्याची अधिकची नैतिक जबाबदारी येत असते याचा विसर अर्णव गोस्वामी सारख्यांना पडला असेलही, पण म्हणून महाराष्ट्रातील माध्यमांना त्याच विसर पडून कसे चालेल ? म्हणूनच आज अर्णवच्या अटकेला माध्यम स्वातंत्र्याशी जोडण्याची चूक करायला महाराष्ट्रातील माध्यमे तयार नाहीत.
मात्र अशावेळी भाजपला अर्णव बद्दल कळवळा निर्माण झाला आहे, माध्यम प्रेमाचा पान्हा फुटला आहे. अर्णवच्या अटकेच्या निषेधार्थ भाजप राज्यभर आंदोलन करीत आहे. यातून सरकारविरोधी रोशचे अपत्य जन्म घेईन असे भाजपला वाटत आहे. मुळात भाजपला माध्यमांबद्दल फार प्रेम आहे असे समजण्याचे काहीच कारण नाही. फडणवीसांच्या राजवटीत महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना शेकडोंनी घडल्या, त्यावेळी कोणत्या भाजपेयीने कधी तोंड उघडले नव्हते. त्यामुळे आता भाजपला आलेला पुळका माध्यमांबद्दलचा नाही तर अर्णव या व्यक्तीबद्दलचा आहे. अर्णव गोस्वामी म्हणजे सारा माध्यमसमूह नाही हे एकदा भाजपने लक्षात घेणे गरजेचे आहे.अर्णवच्या अटकेने माध्यमांना कळा आल्या असत्या तर गोष्ट  वेगळी होती, पण त्या तशा येणार नाहीत. म्हणून भाजप कळा देत आहे, मात्र त्या कळा दाईच्या आहेत, त्यातून भाजपची इच्छा असली तरी काहीच प्रसवणार नाही.

Advertisement

Advertisement