Advertisement

आधी महाराजांना साडेतेरा लाखांना लुटले नंतर महिलेने केला बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रजापत्र | Friday, 05/08/2022
बातमी शेअर करा

अविराज पवार
अंमळनेर-पाटोदा तालुक्यातील हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांना मारहाण करून साडेतेरा लाखांना लुटण्यात आल्या प्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनला मोहरी गावातील पाच जणांविरुद्ध ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता गुन्हे दाखल करण्यात आले.नंतर ४ ऑगस्टला रात्री १२ च्या सुमारास एका महिलेने बुवासाहेब खाडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांना बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी त्यांना बेदम मारहाण केल्याने उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले असून सध्या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.
              पाटोदा तालुक्यातील हनुमानगड नामांकित आहे.या गडावर मठाधिपती म्हणून बुवासाहेब जिजाबा खाडे कारभार पाहतात.२९ जुलै रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी येथील घुगेवस्ती येथे सुरू असलेल्या महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी खाडे गेले होते. या दिवशी मोहरी येथील बाजीराव गिते यांनी महाराजांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.नंतर त्यांना पहाटेच्या सुमारास बाजीराव गिते,भिवा गोपाळघरे, अरूण गिते, राहूल संपत गिते,रामा गिते यांनी मारहाण करून त्यांच्या अंगावरील १३ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले.यानंतर महाराजांनी ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्याला मारहाण करून लुटल्याची फिर्याद दिली.त्यानुसार बाजीराव गिते,भिवा गोपाळघरे, अरूण गिते, राहूल संपत गिते,रामा गितेवर गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान या सर्व प्रकरणानंतर मोहरी येथील रहिवाशी असलेल्या एका महिलेने खर्डा पोलीस ठाण्यात बुवासाहेब जिजाबा खाडेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दिल्याने याप्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१२ जुलै रोजी महाराजाने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले नंतर लग्नास नकार दिल्याचे पीडितेने काल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान प्रकारामुळे खळबळ उडाली असून महाराजाला गावातील ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली.यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असून पुणे येथे उपचार सुरु असल्याची माहिती आहे.   

 

Advertisement

Advertisement