Advertisement

चर्चेतले - तुमचीच शिवसेना खरी तर शिवसेना संपविण्याच्या मनसुब्यांवर का आहे मौन ?

प्रजापत्र | Wednesday, 03/08/2022
बातमी शेअर करा

बीड : शिवसेना उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची यासंदर्भातील न्यायालयीन लढाईच्या संदर्भाने आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होत आहे. त्यात न्यायालय काय तो निर्णय देईलच, मात्र मागच्या महिनाभरापासून एकनाथ शिंदे गट आपलीच शिवसेना खरी असा दावा करीत आलेला आहे. त्याचवेळी शिंदेंनी ज्या भाजपसोबत राजकीय सोयरीक केली आहे ते भाजपवाले मात्र 'शिवसेनेला घरघर लागली आहे, मुंबई महापालिकेत शिवसेना संपेल ' असली विधाने करीत आहेत. मग जर एकनाथ शिंदे आपलीच शिवसेना खरी असा दावा करीत असतील तर शिवसेना संपविण्याच्या भाजपच्या मनसुब्यांवर त्यांचे मौन का आहे ?

एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड करून उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले त्यालाही आता महिनाभरापेक्षा अधिक काळ उलटला आहे. याकाळात शिंदे गटाने आपण पक्षांतर केले नाही आणि आपलीच खरी शिवसेना आहे असा दावा अनेक ठिकाणी केला आहे. अगदी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात देखील एकनाथ शिंदे गटाचा हाच दावा आहे . त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील जाहीर केल्या आहेत. मात्र एकीकडे हे सारे होत असताना , शिंदे आणि त्यांचा गट ज्या भाजपसोबत गेले आहेत, त्या भाजपची भूमिका मात्र शिवसेना संपविण्याची राहिली आहे.

भाजपच्या नेत्यांनी आपले हे मनसुबे वारंवार जाहीर केले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना संपेल असे आतापर्यंत भाजपचे राज्यातील नेते बोलत होते आता केंद्रीय नेतृत्व देखील शिवसेना संपणार असल्याची भाषा करीत आहे. आश्चर्य म्हणजे महिनाभरापूर्वी 'स्वाभिमानाची' 'बाळासाहेबांच्या विचारांची ' भाषा करणारे एकनाथ शिंदे किंवा त्यांचे प्रवक्ते , भाजपच्या या वक्तव्यांवर मात्र काहीच बोलायला तयार नाहीत . एकनाथ शिंदे यांना जर आपलीच शिवसेना खरी आहे असे वाटत असेल तर भाजप जी शिवसेना संपविण्याची भाषा करीत आहे, ती शिंदेंना मान्य आहे का ? भाजप शिवसेना संपविणार आणि शिंदे गट ते पाहत राहणार असे समजायचे का ? का शिवसेना आपल्याला मिळूच शकत नाही याची एकनाथ शिंदेंना खात्री आहे, आणि म्हणूनच ते सेना संपविण्याची भाषा खालमानेने ऐकत आहेत ? जर भाजप सेना संपविणार असेल आणि एकनाथ शिंदे त्यांच्या सोबतीने मुख्यमंत्रीपदाची सत्तेची खुर्ची उबविणार असतील तर या सर्वांना आज ना उद्या भाजपवासी व्हायचे आहे का ? असे अनेक प्रश्न आज सामान्य शिवसैनिकांना देखील पडलेले आहेत. भाजपचे मनसुबे उघड होत असतानाही सच्चे शिवसैनिक म्हणविणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचे 'सैनिक ( ? ) ' भाजपला याचा जाब विचारणार आहेत का ?

Advertisement

Advertisement