मुंबई :बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटांसोबत ‘कौन बनेगा करोडपती’मधील स्पर्धक तसंच आपल्या सूत्रसंचालनामुळे नेहमीच चर्चेत असतात. केबीसीच्या निमित्ताने चाहत्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळत असते. तसंच यानिमित्ताने ज्ञानात भर पडत असल्यानेही अनेक जण पाहणं पसंत करतात. दरम्यान कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी ही तक्रार केली आहे. अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली असून हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसंच अत्यंत सलोख्याने राहणार्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक श्री अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली”.