Advertisement

गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, पण विद्यार्थी हितासाठी क्लासेस सुरु करणारच

प्रजापत्र | Tuesday, 03/11/2020
बातमी शेअर करा

'इतर अनेक राज्यांमध्ये खाजगी क्लासेस सुरु आहेत, ते विद्यार्थ्यांना शिकवित आहेत.महाराष्ट्रात मात्र ऑफलाईन क्लासेसला परवानगी दिली जात नाही. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.आपले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांमध्ये कसे टिकणार ? कशी स्पर्धा करणार ? कोचिंग क्लासेस चालक अडचणीत आहेतच, पण त्यासोबतच विद्यार्थ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. आम्ही अनेकदा परवानगी मागितली आहे. मात्र आता आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही,पण विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही क्लासेस सुरु करणारच आहोत' या शब्दात पीटीए (खाजगी शिक्षक संघटना) चे राज्याध्यक्ष विजय पवार यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. राज्यभरात खाजगी क्लासेस बंद असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर त्यांनी 'प्रजापत्र'शी साधलेला संवाद.

 

 

प्रश्न : कोरोनाच्या काळात क्लासेस बंद आहेत,याचा नेमका काय परिणाम झालाय ?
विजय पवार : तुम्ही खाजगी क्लासेसकडे केवळ खाजगी लोक म्हणून पाहू नका, ही व्यवस्था शिक्षण व्यवस्थेला पूरक आहे. राज्यात एक ते दीड लाख नोंदणीकृत खाजगी क्लासेस चालक आहेत. आज त्यांचं आयुष्य उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि हे एक ते दीड लाख क्लासेस म्हणजे प्रत्येक क्लासवर ५ शिक्षक आणि त्यांचं ४ व्यक्तीच कुटुंब असं जरी म्हटलं तरी २०-२५ लाख लोकसंख्येच्या रोजी रोटीचा हा प्रश्न आहे.

प्रश्न : तुम्ही रोजी रोटीसाठी म्हणून क्लासेस सुरु करायला सांगताय,पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय ?
विजय पवार : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेणारच, घ्यावीच लागणार.क्लासेस जिवंत ठेवायचे असतील तर आम्ही काळजी घेतोच.पालक देखील सर्व खात्री करूनच विद्यार्थी पाठवित असतात.त्यामुळे सुरक्षेचे निर्बंध घालून का होईना, पण क्लासेस सुरु झाले पाहिजेत.

प्रश्न : तुमचा क्लासेस सुरु करण्यासाठीचा अट्टाहास केवळ तुमच्या रोजीरोटीसाठी आहे का ?
विजय पवार : असे म्हणणे हा आमच्यावर अन्याय होईल. मुळात क्लासेस ही विद्यार्थ्यांची गरज आहे. मला सांगा आज कोणत्या महाविद्यालयात नीट, जेईई अशा राष्ट्रीय परीक्षांची तयारी केली जाते, आयआयटीची तयारी केली जाते ? मग या परीक्षांना ज्यांना सामोरे जायचे आहे त्यांनी काय करायचे ? इतर अनेक राज्यांमध्ये क्लासेस सुरु आहेत. मग येथील विद्यार्थ्यांशी आपल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा कशी करायची ?

प्रश्न : कोणत्या राज्यांमध्ये क्लासेस सुरु झाले आहेत ?
विजय पवार : तेलंगणा , दिल्ली, आंध्र,तामिळनाडू अशा अनेक राज्यांमध्ये क्लासेस सुरु आहेत.

प्रश्न : पण महाराष्ट्रात क्लासेसची खरेच गरज आहे का ? शाळा महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षण सुरूच केले आहे ना ?
विजय पवार : मुळात ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. खाजगी क्लासेस ऑनलाईन शिकवू लागले तरी २५- ३० % विद्यार्थीच सहभागी होऊ शकतात. शाळा महाविद्यालयांच्या ऑनलाईन शिक्षणाचे तर विचारायलाच नको. एकतर सगळ्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत, ग्रामीण भागात रेंज नसते, डाटा परवडत नाही.अनेक शिक्षक व्हिडीओ तयार करून पाठवितात ते डाउनलोड होत नाहीत. विद्यार्थ्यांना त्यात काही प्रश्न असतील तर विचारायचे कसे ?
आपला भाग ग्रामीण चेहरा असलेला आहे , आपण आजच पाश्च्यात्य पद्धतीने जाऊ शकत नाही.

प्रश्न : पण अजून कोरोना संपलेला नसताना तुम्ही घाई का करतायेत?
विजय पवार : हे पहा सरकारने कोरोना आहे म्हणून परीक्षेचे वेळापत्रक बदललेले नाही. राज्य मंडळाच्या परीक्षा असतील किंवा राष्ट्रीय परीक्षा,त्या ठरलेल्या वेळीच होणार. आता नोव्हेंबर उजाडलंय अजून महाविद्यालयांमध्ये वर्ग सुरु नाहीत,ऑनलाईनची अवस्था तुम्हाला सांगितली,मग फेब्रुवारीमध्ये परीक्षेला सामोरे कसे जायचे ?

प्रश्न : विद्यार्थी हिताचा मुद्दा समोर करून तुम्ही तुमचे प्रश्न सोडवू पाहत आहात का ?
विजय पवार : विद्यार्थी हित हाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि आमचे प्रश्न म्हणाल तर आम्ही कोण आहोत ? या व्यवसायावर २०-२५ लाख लोकसंख्या अवलंबून आहे. आम्ही राज्य सरकारला जीएसटीमधून वर्षाला २ हजार कोटी रुपये भरतो. आज आमच्यातील अनेकांवर भाजीपाला विकण्याची, मजुरी आणि शेती करण्याची वेळ आली आहे. आम्ही नागरिक आहोतच ना?  आम्ही कर भरतोच ना ? मग आमचे प्रश्न कोणी सोडवायचे ? ८० % क्लासेस भाड्याच्या जागेत आहेत. ८ महिने क्लासेस बंद आहेत,भाडे कसे भरायचे ? सरकारने आम्हाला काय मदत केली आहे? मग आमचे प्रश्न म्हटले तरी बिघडले कोठे ?

प्रश्न : पण विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न आहे ?
विजय पवार : सरकार एमएच सीआयटीचे वर्ग सुरु करते, टाईपरायटिंगला परवानगी देते, इतर अनेक उद्योग व्यवसाय सुरु करते मग क्लासेसलाच काय अडचण आहे?

प्रश्न : या विषयावर सरकारशी कुठल्या पातळीवर चर्चा झाली आहे ?
विजय पवार : मी राज्याध्यक्ष म्हणून सांगतो, पीटीएने मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना निवेदने दिली. मुख्यमंत्री आणि राज्यातील १८ मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली. ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली, पण प्रतिसाद शून्य आहे .

प्रश्न : ही पीटीए नेमकी काय आहे ?
विजय पवार : पीटीए ही खाजगी क्लासेस चालकांची संघटना आहे. २००० साली ही स्थापन झाली. प्रवीण ठाकूर याचे संस्थापक. मध्यंतरी क्लासेस संदर्भात जो कायदा झाला त्याच्या समितीवर पीटीएचे सदस्य होते. राज्यभरातील क्लासेस चालक, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने क्लासेस उभे केले ते याचे सदस्य आहेत. या संघटनेत कॉर्पोरेट क्लासेसला संधी नाही. आम्ही सगळे संघर्षातले आहोत.आम्ही नुसतेच क्लासेस घेतो असे नाही, सामाजिक जबाबदारी देखील पाळतो. कोरोनाच्या काळात आमच्या संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी २० लाख रुपये दिले. एकट्या बीड शहरातून आम्ही २ लाखाचा निधी दिला. आम्ही सामाजिक जबादारी पाळतो, पण आमची जबादारी कोण घेणार ?

प्रश्न : आता परवानगी मिळालीच नाही तर काय ?
विजय पवार : आम्ही परवानगी मागत आहोत. विद्यार्थ्यांना क्लासेसची गरज आहे. अशावेळी सरकारने आणि प्रशासनाने परवानगी द्यावी.पण सरकारने परवानगी दिली नाही म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना,क्लासेस व्यवसायातील लाखो लोकांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. आम्ही क्लासेस सुरु करणार आहोत. यासाठी प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी त्याला आमची तयारी आहे. पण सरकार आणि प्रशासनाने आमचा अंत पाहू नये इतकीच अपेक्षा आहे. क्लासेस सुरु होणारच, आम्ही ते करणारच .

 

Advertisement

Advertisement