परळी - मागील वर्षी मुलीला जन्म दिलेली विवाहिता पुन्हा गर्भवती राहिली. परंतु, दुसऱ्या वेळेस मुलगी नको, मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून त्या डॉक्टरने गर्भ अक्षरशः कापून बाहेर काढला. मुलगी असो वा मुलगा, मला गर्भपात नको, माझ्या बाळाला मारू नका असा आक्रोश करणाऱ्या मातेकडेही त्या डॉक्टरने दुर्लक्ष केले. अखेर त्या मातेच्या फिर्यादीवरून पती, सासू, डॉक्टर आणि अन्य एका व्यक्तीवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सरस्वती नारायण वाघमोडे (वय २२, रा. शिवाजीनगर, परळी) असे त्या पिडीत विवाहितेचे नाव आहे. सरस्वतीच्या फिर्यादीनुसार, २०२० साली तिचे लग्न नारायण अंकुश वाघमोडे याच्यासोबत झाले. नारायण परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीवर आहे. लग्न झाल्यापासूनच पती नारायण आणि सासू छाया तिचा मारहाण, शिवीगाळ करून छळ करत. तिला माहेरी देखील बोलू देत नसत. दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सरस्वतीने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर यावर्षी सरस्वती पुन्हा गर्भवती राहिली.