पूज्य. शि.म. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद ,कळंब तालुका पत्रकार संघ व साप्ताहिक साक्षी पावनज्योत च्या वतीने पत्रकारांची एक दिवशीय कार्यशाळा शि.म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय येथे संपन्न होत आहे.
या निमित्ताने पत्रकारांना या कार्यशाळेत बातमी लेखन, स्तंभलेखन, स्फुट, अग्रलेख आणि वृत्तपत्रीय कायद्याचे तज्ञाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वृत्तपत्र हे लोक शिक्षणाचं व समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात वरचेवर बदल होत आहेत. हे बदल आपण स्वीकारण्यासाठी तयार असणं काळाची गरज आहे काळ बदलला तर आपण त्याबरोबर आपल्यात बदल करून घेतला पाहिजे. होणारे बदल स्वीकारले पाहिजेत ज्यामुळे आपण या बदलत्या परिस्थितीत व स्पर्धेत टिकू शकू व तसेच समाजाला या बदलामुळे जी गरज निर्माण झाली आहे त्या गरजेप्रमाणे आपल्याला काही देता येईल का ? यातून काही नवीन शिकता येईल का? हे वेळोवेळी पाहणे आज गरजेचे आहे .
असे आपण करू शकलो तर निश्चितपणे आपण त्या काळाचा व परिस्थितीचा निश्चितपणे एक भाग बनू शकतो. आपले अस्तित्व आपण शाबूत ठेवू शकतो शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी शिक्षण संस्था उभी केली. याबरोबर त्यांना लोकशिक्षणासाठी व प्रबोधनासाठी आपल्याकडे वृत्तपत्र असावे असे वाटल्याने त्यांनी पावनज्योत साप्ताहिक सुरू केले. आपण जर स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बघितला त्याचबरोबर या काळात ज्या काही सामाजिक प्रबोधनाच्या चळवळी झाल्या या सर्वांमध्ये वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची ठरली १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं सहाजिकच त्याचा उद्देश लोकशिक्षण समाज प्रबोधन हा होता.
लोकमान्य टिळक यांनी मराठा व केसरी ,महात्मा गांधी यांनी हरिजन, साने गुरुजी यांचे विद्यार्थी, साधना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रबुद्ध भारत ,जनता ,मूकनायक या वृत्तपत्रातून आपले विचार लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी शिक्षण संस्था उभी केली व या जोडीला त्यांनी पावन ज्योत हे साप्ताहिक सुरू केले , या साप्ताहिकाचे प्रकाशन थांबले होते. पुन्हा साक्षी पावनज्योत रूपाने संपादक सुभाष घोडके नित्य प्रकाशित करीत आहेत . बदलत्या काळात व गरजेनुसार वृत्तपत्राच्या क्षेत्रातही प्रचंड बदल व क्रांती होत गेली आहे.
छपाईच्या क्षेत्रात, तंत्रज्ञानात प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत असताना इलेक्ट्रॉनिक मीडिया चा झपाट्याने प्रचार व प्रसार झाला आहे. यामुळे ही माध्यम समाज माध्यमाचा एक भाग बनले आहेत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे , घडणाऱ्या घटनेचा साक्षीदार बनत आहेत. ही साधनं हाताळीत असताना याविषयीचं ज्ञान व माहिती घेण्याआधी ही साधन आपल्या हाती येत आहेत. यामुळे यातलं तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करता जरी आलं असला तरी याचे चांगले वाईट परिणाम याविषयी आपण प्रामुख्याने युवा पिढी बेफिकीर आहे.
ही पिढी भविष्यातील होणाऱ्या दुरगामी परिणामाचा विचार करत नाही तसा विचार करायला वेळ नाही. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होणाऱ्या घटना घडतात. चुकीचे संदेश गेल्यामुळे गैरसमज व गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे अस्थिरता बनते हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपणास याविषयीचं ज्ञान व सावधानता बाळगणे गरजेचे आहे . विविध वृत्तपत्रांमध्ये व वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण असलं पाहिजे. ज्यामुळे आपणास पसरणारे वृत्त यातील खरेपणा तपासता येईल यासाठी वृत्तपत्र विद्याभ्यास आपणास पदवी घेता येते परंतु छंद म्हणून अनेक तरुण बातमीदार होण्यासाठी उत्सुक असतात.
आपला आवाज अधिकारी व पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे जनसंमान्याचे प्रश्न त्यांच्या वेदना अडचणी मांडता आल्या पाहिजेत. चांगले विचार समाजात गेले पाहिजेत नातेवाईक व मित्रांना या विचाराच्या मेजवानीत सहभागी होता आले पाहिजे. या साठी या समाज माध्यमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे या बदलत्या तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत आहेत. काही टी. व्ही चॅनल्स ने जाहिरात केली. आपण स्वतः पत्रकार समजून चांगला फोटो दृश्य आमच्याकडे पाठवू शकता त्याला प्रसिद्धी देण्यात येईल . साहजिकच घडलेली घटना व प्रसंग याची सत्यता अधिक स्पष्ट होते व पुरावा ही मिळतो.
ही झाली एक बाजू तर दुसरीकडे सोशल मीडिया वरून ज्यावेळी एखादी घटना व तिचा फोटो व्हायरल होतो पण तो व्हिडिओ खरा आहे का ? याची सत्यता तपासण्यासाठी टी .व्ही चॅनल्स स्वतंत्र कार्यक्रम घेत आहेत. कारण या माध्यमावरच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ नये हे बघणे संयुक्तिक ठरते . या माध्यमाचा आपली जिज्ञासा व ज्ञान वाढीसाठी जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी आपण सदैव दक्ष असले पाहिजे. यासाठीचे शिक्षण कडे नव्या पिढीचा कल वाढला पाहिजे यासाठीचे प्रबोधन व प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वाचे आहेत यापासून समाजाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. गेल्या दहा वर्षापूर्वी वृत्तपत्राच्या कार्यालयाकडे बातमी पाठवण्यासाठी फॅक्स चा वापर केला जायचा पुढे मेल ,नेटवर्क द्वारे ही बातमी पाठवली जाऊ लागली .
आज आपण पाहतोय प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे व यावर बातमी टाईप करून कार्यालयाकडे पाठवली जाते. यामुळे जलद बातमी कार्यालयाला मिळत आहे. बातमी लेखन, अग्रलेख , स्तंभलेखन कसे लिहावेत वृत्तपत्रीय कायदे काय ? आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे .यामुळे ही कार्यशाळा अधिक महत्त्वाची ठरत आहे. हे शिक्षण महाविद्यालयीन शिक्षणाचा एक भाग बनला पाहिजे. १९८३ मध्ये वसंतराव नाईक महाविद्यालय औरंगाबाद यांनी एन. एस. एस माध्यमातून मराठवाडा पातळीवर वृत्तपत्र संपादन कौशल्य शिबिर घेतले होते.मी त्याकाळी शि .म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून सहभागी झालो होतो.
या दहा दिवसाच्या शिबिरात पत्रकार महर्षी म .य .उर्फ बाबा दळवी ,लोकमतचे संपादक राजेंद्र बाबू दर्डा ,भारत सदावर्ते ,,विद्याधर सदावर्ते वृत्तपत्र विद्याभ्यास विभाग विद्यापीठ वि .ल. धारूरकर, प्रा. सुधीर गव्हाणे यांनी बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. त्या काळातील दैनिक मराठवाडा, दैनिक लोकमत ,दैनिक अजिंठा, या वृत्तपत्रातील अनुभवी व वरिष्ठ पत्रकारांनी आपले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या सारखे शिबिर आज होताना दिसत नाहीत. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने व साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके यानी साप्ताहिक साक्षी या नावाने साप्ताहिक सुरू केले होते .
यातील साक्षी या शीर्षकात सुभाष घोडके साप्ताहिक अंक प्रकाशित करीत होते. या नंतर आता शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचे पावनज्योत या दोन्ही शीर्षकांचे साक्षी पावन ज्योत च्या माध्यमातून कळंब पंचक्रोशीतील सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक, आर्थिक तसेच कलाकारांना वंचितांना, साहित्यिकांना योग्य संधी देवून लोकांसमोर आणण्याचं व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम सातत्याने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आपल्या परिसरातील विविध सामाजिक संस्था, शिक्षण संस्था सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार यांना वृत्तपत्र लिखाणाविषयी माहिती मिळावी.
त्यांना यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक जोमाने काम करता येईल या भावनेतून या विचारातून ही कार्यशाळा जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे ,ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेचे सचिव अशोकराव मोहेकर, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे व साक्षी पवन ज्योतचे संपादक सुभाष घोडके ,अविनाश घोडके यांच्या प्रयत्नातून ही कार्यशाळा सफल होत आहे. त्याचा परिणाम निश्चित चांगला होणार असून यासारखी चळवळ मोठ्या होण्याची गरज आहे ,असे या निमित्ताने नमूद केले पाहिजे.
माधवसिंग राजपूत
पत्रकार, कळंब