बीड : ' आवाssssज कोणाचा , शिवसेनेचा ' म्हणत 'त्याची' एक झलक पाहायला जमलेली गर्दी , 'त्यांनी ' एक कटाक्ष टाकावा म्हणून उंचावणारे हात , वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही तितक्याच त्वेषाने डोक्यावर भगवा झेंडा नाचविणारे वृद्ध शिवसैनिक आणि सहानुभूतीमुळे अश्रुंचे फुटणारे बांध , हे सारे चित्र होते औरंगाबाद जिल्ह्यातले. निमित्त होता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा दौरा . काय पैठण, काय बिडकीन अन काय आणखी कोणते खेडे , शिवसैनिक आजही 'ओक्के'मध्ये उद्धव ठाकरेंच्याच सेनेसोबत असल्याचेच दिसत होते.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत उभी फूट पाडून आता शिवसेनेवरच दावा सांगायचं प्रयत्न सुरु केला असला तरी किमान मराठवाड्याच्या ग्रामीण भागात तरी शिवसेना आणि ठाकरे वेगळे करता येणार नसल्याचे चित्र आहे. सेनेतील बंडाळी नंतर आता आदित्य ठाकरेंनी मराठवाडा दौरा सुरु केला आहे. शनिवारी आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर होते. औरंगाबाद जिल्ह्यात त्यांनी दौरा केला. त्यांचा हा दौरा म्हणजे खऱ्याअर्थाने शक्ती परीक्षा होती आणि त्यांच्या दौऱ्यात उपस्थित जनसागराने आजही ग्रामीण भागात शिवसेना ठाकरेंचीच असल्याचे स्पष्ट झाले.
आदित्य ठाकरेंच्या स्वागताला प्रत्येक खेड्यामध्ये सुद्धा मोठ्याप्रमाणावर जमलेली गर्दी आणि त्या गर्दीतला उत्साह , आदित्य ठाकरे बंडाची कहाणी सांगत असताना लोकांच्या अश्रुंचे फुटलेले बांध आणि त्याही परिस्थितीत 'आवाsssज कोणाचा .... शिवसेनेचाच' म्हणत खांद्यावर भगवा फडकविणार सत्तरीपार झालेले वृद्ध, तरुणाईपासून ते वृद्धांपर्यंत आजही ठाकरे सेनेचीच जादू जनतेत आहे हे सांगणारे हे चित्र होते. हे चित्र ठाकरेंच्या सेनेला ऊर्जा देणारे असतानाच बंडखोरांना धडकी भरावी असे आहे. यातूनच राज्यातील भावी राजकारणाची दिशा काय असेल याचा अंदाज येत आहे. सेनेसाठी आजच्या आश्रुंचीच उद्या फुले होणार आहेत याचेच हे संकेत आहेत.