धुवाधार पावसानंतर दोन दिवसांपासून राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, उद्यापासून 4 दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी जोरदार सहीसह हलका ते मध्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
18 जिल्ह्यांत मुसळधार
राज्यात मुंबईसह कोकण, गोवा व विदर्भ वगळता नाशिकसह उर्वरित मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांत 23 ते 26 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतही या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता आहे.
बुधवारीही राज्यात गोंदिया, माथेरान, महाबळेश्वर आणि नाशिक अशा मोजक्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस झाला. उर्वरित ठिकाणी पावसाने उघडीप घेतली होती. हवामान विभागाने पुढील 4 दिवस नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, नंदुरबार, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, जालना या 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.