अंबाजोगाई - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या पतीला अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्या. श्रीमती एस. जे. यांनी पंधरा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. संतोष उमाजी जाधव (रा. काळवीट तांडा, ता. अंबाजोगाई) असे त्या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सदरील घटना २०१८ साली घडली होती. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी हनुमंत शामराव राठोड, रा. वानटाकळी तांडा यांची मुलगी अहिल्याबाई हिचे लग्न आरोपी संतोष उमाजी जाधव याच्यासोबत झाले होते. त्यानंतर त्याला दोन मुले होते. त्यानंतर आरोपी हा तिला नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेवून त्रास देत होता. घटनेच्या दहा दिवसापूर्वी त्याने मला पत्नीची गरज नाही असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत अहिल्याबाईला माहेरी पाठविले होते. त्यानंतर घटनेच्या तीन दिवस अगोदर पत्नीला त्रास देणार नाही व मुलाच्या जेवणाची व्यवस्था होत नाही म्हणून तिला परत काळवटी तांडा येथे घरी बोलावून घेतले. ०३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी अहिल्याबाई घरी झोपेत असताना संतोषने कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात डाव्या कानाच्या वर वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात अहिल्याबाई गंभीर जखमी झाली. त्याच्यावर अंबाजोगाई आणि लातूर येथे उपचार करण्यात आले. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात संतोष जाधव याच्यावर कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले. तत्कालीन पोलीस निरिक्षक एच. एस. गंदम यांनी तपास पूर्ण करून आरोपी विरूध्द दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.
कायमस्वरूपी गेली वाचा
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून अहिल्याबाईचा जीव तर वाचवला, मात्र, संतोषच्या हल्ल्यामुळे तिच्या डोक्यात झालेल्या गंभीर जेख्मेमुळे अहिल्याबाईची वाचा (बोलण्याची क्षमता) कायमस्वरूपी पूर्णतः गेली.