Advertisement

नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आघाड्यांचा बोलबाला

प्रजापत्र | Tuesday, 12/07/2022
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, तर जिल्हापरिषद , पंचायत समिती निवडणुकीचे देखील वेध लागलेले आहेत. आज घडीला अनेक ठिकाणी कोण कोणत्या पक्षावर लढणार का आघाडीवर लढणार याबद्दल संभ्रम कायम आहेत. प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी देखील आपल्या पक्षाचे चिन्ह घेणार का राजकीय सोय म्हणून 'आघाडी'लाच प्राधान्य देणार हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. जिल्ह्यातील अनेकांनी 'आघाड्यांची ' नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यात आजघडीला २० नोंदणीकृत राजकीय पक्ष असून आणखी ३ पक्ष मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत .

जिल्ह्यातील ६ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच जिल्हापरिषद निवडणुका देखील येत्या काही दिवसात अपेक्षित आहेत. अनेकदा राजकीय सोय म्हणून किंवा पक्षात आपल्या मनाप्रमाणे होणार नसेल तर पुढारी स्थानिक पातळीवर 'आघाडी' चा पर्याय वापरतात . त्यामुळे आताही अनेकांना राजकीय पक्ष का आघाडी याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. राजकारणात कधी कोणती वेळ येत नसते , त्यामुळे अनेकांनी अगोदरच तयारी म्हणून आपल्या आघाडीची राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे. त्यामुळे आता त्या नेत्याने आघाडीवर लढायचे ठरविले तर त्यांच्या सर्व उमेदवारांना एक चिन्ह घेता येईल.

अजूनही कोणत्याच नेत्यांनी आपले सारे पत्ते उघड केलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हांवरच लढेल असे आज तरी बीड, परळी , गेवराई आदी ठिकाणी दिसत आहे. जिल्ह्यात प्रमुख लढत राष्ट्रवादी, भाजप आणि बीड शहरात शिवसेना यांच्यात होईल, तर वंचित आणि एमआयएम यांचाही प्रभाव असणार आहे. मात्र राजकीय पक्षापेक्षाही अनेकांना 'आघाडी 'ची भूरळ स्पष्ट आहे.

 

असे आहेत जिल्ह्यातील नोंदणीकृत पक्ष

बीड तालुका : काकू नाना विकास आघाडी (२०१६ ), स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडी (२०१२ ) , बीड जनता विकास आघाडी (२०२१ ), राष्ट्रीय अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी (२०२२ ) , गेवराई तालुका : गेवराई विकास आघाडी (२०११ ), जय जवान जय किसान शेतकरी संघटना (२०१४ ), बदामराव पंडित मित्रमंडळ आघाडी (२०१६ ), भराटवाडी एकता पार्टी (२०१६ ) ,मराठा संग्राम पक्ष (२०२१ ), परळी तालुका : जन क्रांती सेना (२०१४ ) , अंबाजोगाई तालुका : अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडी (२०१६ , मूळ नाव विमलताई मुंदडा विकास आघाडी ) , टिपू सुलतान सेना (२०१६ ) लोकविकास महाआघाडी (२०२१ ), माजलगाव तालुका : जनविकास आघाडी (२०१६ ),मोहन जगताप मित्रमंडळ (२०१७ ), जमायत ए उलेमा हिंद पार्टी (२०१७ ),धारूर तालुका : राष्ट्रीय क्रांती सेना (२०११ ), भारतीय युवा सेना (२०१६ ) , केज तालुका : जनविकास प्रतिष्ठान आघाडी (२०१९ ), राष्ट्रीय भगवान सेना (२०१९ )

Advertisement

Advertisement