Advertisement

हा पंकजा मुंडेंच्या प्रतिष्ठेला धक्का

प्रजापत्र | Saturday, 31/10/2020
बातमी शेअर करा

बीड-माजलगाव शहर हे तसे सातत्याने भाजपच्या बाजूने चालणारे , संघाचा पगडा असणारा मोठा भाग या शहरात आहे. त्यासोबतच अल्पसंख्यांक समाज देखील निर्णायक आहे. या शहरात चार वर्षापूर्वी सहाल चाऊस यांना सोबत घेऊन भाजपने नगरपालिकेवर ताबा मिळविला. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी माजलगाव नगरपालिकेतील विजय महत्वाचा होता. मात्र माजलगावच्या जनतेने दिलेले हे यश भाजपला 5 वर्ष टिकविता आले नाही आणि आता ही पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार असल्याचे चित्र आहे. खरे तर हा पंकजा मुंडेंच्या प्रतिष्ठेलाच धक्का असणार आहे.
माजलगाव नगरपालिकेच्या 4 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने सहाल चाऊस यांच्यामागे शक्ती उभी केली आणि त्यांना थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून देखील आणले. त्यावेळी पंकजा मुंडे आणि तत्कालीन आ. आर. टी. देशमुख यांनी नगरपालिकेवर भाजपची सत्ता देखील आणली. या संपूर्ण काळात माजलगावकरांनी तत्कालीन मंत्री पंकजा मुंडेंवर विश्वास टाकला होता . मात्र त्यांच्या विश्वासावर जनतेने ज्या लोकांना निवडून दिले त्यांना एकत्र ठेवण्यात पंकजा मुंडेंना यश आले नाही, आणि आपले नगराध्यक्ष काय करीत आहेत हे देखील त्यांनी पहिले नाही. परिणामी नगराध्यक्षांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक होऊन बडतर्फ व्हावे लागले.
दरम्यान भाजपला अंतर्गत बेदिली देखील रोखता आली नाही. खा. डॉ . प्रीतम मुंडे या जिल्ह्यात असतानाच भाजपचेच नगरसेवक आपल्याच नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल करायला बळ देत होते हे सार्‍या जिल्ह्याने पहिले आणि भाजपच्या नगराध्यक्षांना मदतीसाठी इतर नेत्यांचा आसरा घ्यावा लागला . त्याहीवेळी पंकजा मुंडे यांनी हस्तक्षेप केला नाही. लोकांनी पंकजा मुंडेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदान केले होते. मात्र पंकजा मुंडेंनी माजलगाव वार्‍यावर सोडले आणि त्यामुळेच कायम भाजपची पाठराखण करणार्‍या शहरात आता राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष दिसेल असे चित्र आहे. पंकजा मुंडेंच्या राजकारणालाच  हा धक्का आहे.

Advertisement

Advertisement