बीड दि.7 (प्रतिनिधी) : मराठवाड्यात कधी कोरड्या दुष्काळाने तर कधी ओल्या दुष्काळाने शेतकर्यांना आणि नागरिकांना सातत्याने सामोरे जावे लागते. अधिक करून कोरड्या दुष्काळामुळे लाखो शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असते, ही बाब लक्षात घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्याच्या ‘काळ्या आईची’ तहान भागण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम नद्यांचे पाणी मराठवाड्यात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केल्यामुळे अखेर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे मराठवाडा पाणीदार करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीमधील पूराचे पाणी कॅनलच्या माध्यमातून मराठवाड्यात नेले जाणार आहे. 2019 मध्ये सांगली, कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा जागतिक बँकेकडून एका प्रोजेक्टला मान्यता दिली होती. त्यात वळण-बंधारे आणि कॅनल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? यावर अभ्यास करण्यात आला होता. आजच्या बैठकीत यावर पुन्हा चर्चा झाली असून, जागतिक बँकेने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे,माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी या बाबत सातत्याने हा प्रश्न लावून धरला आहे,हा प्रश्न सुटला तर मराठवाड्याच्या काळ्या आईची तहान भागणार आहे,माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यासाठी गेल्या काही वर्षांपासून वेळोवेळी निवेदने देऊन जाहीर कार्यक्रमात वारंवार हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे अखेर हा प्रश्न मार्गी लागत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.