बीड - घराच्या पाठीमागील बाजुवरून छतावर चढत अज्ञात चोरट्याने छतावरच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरामधील कपाटात ठेवलेले तीस तोळे सोने नगदी एक लाख रुपये चोरून नेल्याची जबरी चोरीची घटना शहरातील बामणवाडी येथील भागीरथ मोहनलाल चरखा यांच्या निवासस्थानी घडली होती. या चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी पेठबीड पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी भेट देऊन श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले काही मुद्देमालही जप्त केल्याची माहिती मिळत आहे.
शहरातील बामणवाडी भागात भागीरथ मोहनलाल चरखा हे आपल्या कुटुंबियासोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. सोमवारी पहाटेे पाच वाजण्याच्या सुमारास घरातील लोक उठल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी चरखा कुटुंबियांच्या घराला लक्ष्य करत घराच्या पाठीमागील बाजुवरून छतावर प्रवेश करत छतावरचा दरवाजा तोडून घरामध्ये रोख रक्कम आणि किंमती ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी उघड झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पेठबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. श्वानपथकासह घटनास्थळावर फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी बारकाईने पाहणी केली होती. सदरची चोरी ही कोणीतरी पाळत ठेवून केली असण्याचा प्राथमिक कयास काढला जात होता. पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय संजय तुपे यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संयज तुपे यांनी तपासाची चके्र फिरवत अवघ्या 24 तासात आरोपी शेख कलीम उर्फ कल्लु वय 28 वर्ष रा. पेठ बीड, हल्ली मुक्काम औरंगाबाद याला गेवराई हद्दीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.