बीड - 50 हजार रुपये उसने घेतल्यानंतर ते देण्यास उशीर झाल्याने आम्ही तुम्हाला 5 रुपये टक्क्याप्रमाणे पैसे देतोत, असे सांगून पैशाचा तगादा लावल्याने आणि वारंवार त्रास देत, धमक्या दिल्या. या त्रासाला कंटाळून एका 62 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना काल रात्री आहेर येथे घडली.
उत्तमराव देवराव घाडगे (वय 62 वर्षे, रा. आहेरवडगाव ता. बीड) यांनी किसन बन्सी कदम व स्वाती किसन कदम यांच्याकडून 50 हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसे देण्यास उशीर झाला. त्यामुळे किसन कदम यांनी पैशाचा तगादा लावला. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत मी तुला 5 रुपये शेकड्याने पैसे परत करतो, असे सांगूनही कदम यांनी न ऐकता त्यांना वारंवार त्रास देण्यास सुरू केले. प्रत्यक्ष आणि फोनवरून धमक्याही दिल्या. या त्रासाला कंटाळून उत्तमराव यांनी स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात मयताचा मुलगा विलास उत्तमराव घाडगे याच्या फियार्दीवरून किसन बन्सी कदम, स्वाती किसन कदम (दो. रा. बीड), रामू विठ्ठल घाडगे (रा. आहेरवडगाव) व इतर दोन जणांविरोधात कलम 306, 506, 507, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.