Advertisement

शिवसेना बळकविण्याची वाट शिंदेंसाठी अवघडच

प्रजापत्र | Sunday, 26/06/2022
बातमी शेअर करा

बीड दि. २५ (प्रतिनिधी) : राज्यातील दोन तृतीयांश विधीमंडळ पक्ष सोबत असल्याने मुळ शिवसेनेवरच दावा करण्याचे एकनाथ शिंदे गटाचे स्वप्न असले तरी ही वाट शिंदेसाठी अवघडच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे 'शिवसेना बाळासाहेब गट' असले उद्योग करत असल्याचे चित्र आहे.

 

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड म्हणून एकनाथ शिंदेच्या बंडाकडे पाहिले जाते. शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षातील ५५ पैकी सुमारे ४० आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे करीत आहेत. त्यामुळेच आपलीच शिवसेना खरी आहे असे सांगत मुळ पक्षावरच दावा करण्याचा एकनाथ शिंदे गटाचा मनसुबा होता मात्र सध्या तरी त्यांच्यासाठी ही वाट अवघड असल्याचे चित्र आहे.

विधीमंडळ पक्ष आणि मुळ पक्ष संघटना या दोन वेगळ्या बाबी आहेत. विधीमंडळ पक्ष हा त्या विधानसभेची मुदत असेपर्यंत अस्तित्वात असतो. राजकीय पक्षाचे तसे नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेना शिवसेनेवर दावा करुन धनुष्यबाण चिन्ह घ्यायचे असेल तर त्यांना त्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उभी फूट पाडावी लागेल. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीपासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत दोन •तृतीयांश लोक सोबत घेतले तरच मुळ पक्षावर एकनाथ शिंदे दावा करु शकतात. मात्र शिवसेनेची घटना यात एकनाथ शिंदेसमोरची मोठी अडचण आहे.

शिवसेनेच्या १४ सदस्यीय राष्ट्रीय कायकारीणीत पाच सदस्य नेमण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. आणि एकनाथ शिंदे हे उध्दव ठाकरेंनी नेमलेल्या पाच पैकी एकआहेत. शिवसेनेच्याघटनेप्रमाणे पक्षमुखांना हे पाच सदस्य नेमण्याचा जसा अधिकार आहे तसेच कुठल्याही क्षणी त्यांना काढून टाकण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत एकनाथ शिंदेंच्या बाजूने बहुमत जमणे शक्य नाही. राष्ट्रीय कार्यकारणीसोबतच जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख यांची भूमिका देखील शिवसेनेच्या घटनेप्रमाणे महत्वाची आहे. आणि या ठिकाणी एकनाथ शिंदेना घुसखोरी करायला संधी नाही. त्यामुळेच विधीमंडळ पक्षाचे काहीही झाले तरी धनुष्यबाण मिळविणे शिंदेसाठी अवघड आहे.म्हणूनच आता शिंदेंनी वेगळ्या गटाची वाट चोखाळली आहे.

 

Advertisement

Advertisement