Advertisement

बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक

प्रजापत्र | Saturday, 25/06/2022
बातमी शेअर करा

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदें विरुद्ध उद्धव ठाकरे अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे. बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही एकनाथ शिंदेवर नाराज झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली आहे.

 

 

पुण्यातील बालाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय आहे. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. “ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल”, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे.

 

 

शिवसेनेकडून बंडखोरांना नोटीस
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत बंड करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. ४८ तासांच्या आता या आमदरांना आपले भूमिका मांडण्यास सांगितले आहे. जर आमदारांनी या वेळेत आपली भूमिका मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

Advertisement

Advertisement