Advertisement

संपादकीय अग्रलेख-रेल्वे आली, विमानतळ देखील होईल, पण रस्त्यांचे काय ?अजित पवार टचअप करणार तरी कोठे?

प्रजापत्र | Friday, 19/09/2025
बातमी शेअर करा

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून सगळीकडेच विकासाचा रथ किती वेगाने धावत आहे हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सत्ताधाऱ्यांमध्ये लागलेली आहे. अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात तर ती स्पर्धा अधिकच आहे. अनेक कामे पूर्ण नसताना रेल्वेचे केलेले लोकार्पण  एकवेळ समजू शकते पण अगोदरच वापरात असलेल्या पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीचे लोकार्पण करण्याचा मोह खुद्द मुख्यमंत्र्यांना देखील टाळता येऊ नये हे जरा आश्चर्यच. हे सारे होत असताना अजित पवारांनी ' आम्ही भरभरून निधी देत आहोत, विकास कामे होत आहेत, रेल्वे आली, विमानतळ देखील होईल ' अशी घोषणा केली, त्याचेही स्वागत , पण हे होत असताना रेल्वे स्थानकापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जवळच्या रस्त्यावरचे खड्डे दिसू नयेत म्हणून लांबच्या रस्त्याने जावे लागते हे वास्तव असलेल्या बीड जिल्ह्यात शहरातले रस्ते, महामार्ग आणि गावखेड्यांना जोडणारे रस्ते कधी होतील याचे उत्तर मिळाले तरी खूप होईल.
 

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची नियुक्ती काय झाली , बीड जिल्ह्यातील जनतेला जणू स्वर्ग दोन बोटे उरला आहे का काय असेच वाटावे असे चित्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निर्माण केले आहे. किंबहुना कार्यकर्त्यांपेक्षा अधिक पोटतिडकीने प्रशासनातील अधिकारी अजित पवारांच्या विकास गाथा सांगत आहेत. विकासाचे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी इच्छाशक्ती आणि त्याला राजसत्तेची जोड लागत असते हे मान्य , पण म्हणून विकास नेमके कशाला म्हणायचे ? केवळ सिमेंटचे जंगल वाटावे अशा मोठमोठ्या इमारती बांधणे म्हणजे विकास होणार आहे का ? बीड जिल्हा रुग्णालयाला कॅथलॅबची आवश्यकता होतीच, नाही असे नाही , पण तेथील इमारतीला टचअप करायला मी  येतो असे उपरोधिकपणे बोलणारे अजित पवार त्याच रुग्णालयात सामान्यांना साधी औषधी मिळत नाहीत, अगदी कोणाचा मृत्यू झाला तर पोस्टमोर्टम करण्यासाठी प्लास्टिक देखील बाहेरून आणावे लागते , जिल्ह्यातील उपकेंद्रांमध्ये खोकल्याचे औषध देखील वेळेवर मिळत नाही त्याबद्दल बोलणार आहेत का ? जिल्हा रुग्णालयाला हे सरकार पूर्णवेळ जिल्हाशल्यचिकित्सक देऊ शकत नाही ते सत्ताधारी बीड जिल्ह्याला आत्मचिंतन सकरण्याचा सल्ला देतात हे तर आणखीच आश्चर्य. सांगायचे म्हटले तर विकासाचे पोकळ दावे आणि केवळ इमारती उभारण्यातला विकास यावर खूप काही लिहिता येईल , पण पुन्हा 'आतापर्यंत कोणी केले नाही, आता मी काही तरी करतोय तर सल्ले देता ' म्हणायला अजित पवार मोकळे आहेतच.
पण काही महत्वाच्या गोष्टी कोणीतरी बोलल्याचं पाहिजेत . आपल्या संतांनी देखील 'काय करू आता ठेवूनिया भीड,  निःशंक हे तोंड वाजविले,नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण ,सार्थक लाजोनी नव्हे हित' असेच सांगितले आहे. त्यामुळेच बीडमध्ये एकीकडे रेल्वेचे स्वागत, विमानतळाच्या घोषणा होत असताना जेथून सामान्य , अतिसामान्यांना प्रवास करायचा आहे त्या रस्त्यांचे काय ? हा बीडकरांचा प्रश्न आहे. बीड शहरातील रस्त्यांची अवस्था अशी आहे, की रोज सामान्यांचे मणके ढिले करणारे रस्ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिसू नयेत म्हणून रेल्वे स्टेशनच्या उदघाटनाला या मान्यवरांना लांबच्या रस्त्याने नेण्याचा आणि दारिद्र्य झाकण्याचा तोंडपुंजेपणा प्रशासनाला करावा लागला. रेल्वे स्टेशनला हेलिपॅडपासून जवळच्या रस्त्याने मान्यवरांना नेण्याची हिम्मत प्रशासनाची झाली नाही. प्रश्न या एका रस्त्याचा नाही, जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची अवस्था काय आहे ? गढी- माजलगाव महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत, खामगाव- पंढरपूर महामार्ग तर मृत्यूमार्ग बनला आहे, मांजरसुम्भा -अंबाजोगाई रस्त्यावर थोडाही  पाऊस झाला की पाणी साचलेले असते . जर राष्ट्रीय महामार्गांची अवस्था अशी असेल तर गावखेडयातील रस्त्यांबद्दल बॊलायचे कोणी ? जिल्ह्यातील बहुतांश तांड्यांना जायला आजही रस्ते नाहीत. या लोकांना रेल्वे आणि विमानाचे अप्रूप असेल , विमानतळ झाले तर उद्योगपती येतील हे देखील मान्य आणि त्याचे स्वागत , मात्र गावखेड्यातल्या माय बहिणीची प्रसूती खड्डेयुक्त रस्त्यामुळे प्रवासातच होते, अनेक विद्यार्थिनींना रस्ता नसल्यामुळे एसटी पोहचत नाही म्हणून शाळा सोडावी लागते हे बीडचे चित्र प्रशासन अजित पवारांना दाखविणार आहे का ? आणि तो खरा चेहरा पाहण्याची हिम्मत अजित पवार तरी दाखविणार आहेत का ?
बीड जिल्ह्यात येऊन उठसूट इथल्या नेतृत्वाला दोष देऊन तरी काय हशील होणार आहे ? आज पर्यंत कोणीच काहीच केले नाही असे जेव्हा अजित पवार म्हणत असतात, त्यावेळी हे सारे 'कोणीच ' त्यांच्याच सोबत होते याचा त्यांना विसर पडलेला असतो. पण अजित पवारांना बोलणार तरी कोण ? दुभत्या गाईच्या लाथा देखील गोड असतात, त्यामुळे अजित पवारांनी जनतेला' मूर्ख ' ठरविले तरी त्याचे स्वागतच करणे भाग असते अशी परिस्थिती आहे. अजित पवार काय किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय, त्यांच्याकडे असलेल्या विकासाच्या दृष्टीला नाव ठेवण्याचे काही कारण नाही, मात्र या दोघांनीही केवळ प्रशासन दाखवीत असलेल्या चकाचक चष्म्यातून बीडचा चेहरा न पाहता जरा वास्तवातलं बीड पाहिले आणि पायाभूत सुविधा दिल्या तर बीडकरांचे भले होईल. नाहीतर बाकी मोठमोठ्या घोषणा, मोठमोठ्या इमारती , टाळ्या आणि शिट्ट्या आहेतच
.
 

Advertisement

Advertisement