Advertisement

संजय राउतांचा फडणवीसांना खोचक टोला!

प्रजापत्र | Saturday, 25/06/2022
बातमी शेअर करा

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि इतर काही अपक्ष आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे सरकार दोलायमान स्थितीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी बोलताना आपण या दबावाला घाबरून कधीही भाजपासोबत हातमिळवणी करणार नाही, असं ठणकावून सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस बैठकांमधून आगामी परिस्थितीत काय पावलं उचलावीत, याविषयी सल्लामसलत करत असल्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे.आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊतांनी यासंदर्भात टोला लगावला आहे. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी फडणवीसांच्या बैठकांविषयी विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यांना यात न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, तुमची उरली सुरली प्रतिष्ठा वाचवा, असं देखील राऊत यावेळी म्हणाले आहेत.

“आम्ही आमचं बघून घेऊ”

“देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन. तुम्ही या गोंधळात पडू नका. पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल. तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ”, असं राऊत म्हणाले.

आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी आजच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याची माहिती दिली. “राष्ट्रीय कार्यकारिणी कोणत्याही पक्षासाठी फार महत्त्वाची असते. आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक निर्णय होतील. पक्षाच्या भवितव्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा होईल. काही नव्या नियुक्त्या होतील. राष्ट्रवादी आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या पाठिशी मजबुतीनं उभे आहेत. आजची राष्ट्रीय कार्यकारिणी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाला दिशा देणारी असेल”, असं ते म्हणाले.

Advertisement

Advertisement