"पुरेसा वेळ नसल्याने काही प्रकरणे वगळणार"
मुंबई :इयत्ता नववी, दहावी गणित अभ्यासक्रमात आणखी कपात; पुरेसा वेळ नसल्याने काही प्रकरणे वगळण
कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. मात्र, इयत्ता नववी व दहावीच्या गणिताचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शाळा कधी सुरू होतील याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. दरवर्षी १५ जूनच्या दरम्यान शाळा सुरू होतात. मात्र, सध्या ऑक्टोबर संपला तरी शाळा सुरू झालेल्या नाहीत. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाचा विचार सुरू आहे. परंतु, दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. तसेच शिक्षकांनादेखील अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणे अशक्य आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्यात येणार आहे.
२०२०-२१ या वर्षाच्या परीक्षेसाठी या प्रकरणावर प्रश्न येणार नाहीत. मात्र, जो अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे तो पुढील अभ्यासक्रमासाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी भविष्यात उपयोगी पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वगळलेल्या अभ्यासक्रमाचे स्वयंअध्ययन करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी त्यांच्या सवडीनुसार सोडवून घ्यावा,असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.