Advertisement

उतावीळपणाला हवा लगाम

प्रजापत्र | Monday, 13/06/2022
बातमी शेअर करा

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांना राग येणे साहजिक आहे. त्यांनी आपला राग व्यक्त करणे देखील समजू शकतोत. आपल्या नेत्याचा विधानसभेत पराभव झाला, नव्हे जनतेने त्यांना नाकारले असले तरी पक्षाने त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे आणि रिक्त होणाऱ्या प्रत्येक जागेवर आपल्या नित्याचाच अधिकार आहे असे वाटणे देखील कार्यकर्ता किंवा समर्थक म्हणून साहजिक आहे. मात्र कार्यकर्ता किंवा समर्थकांना असे कितीही वाटत असले तरी राजकारण इतके सरळ सहज कधीच नसते. मात्र हे समजून घेण्याची कुवत जिथे स्वतः पंकजा मुंडे दाखवित नाहीत, तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार ?
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी, त्याहीपेक्षा पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी आपला राग व्यक्त केला आहे. मुळात प्रवीण दरेकरांचा ताफा अडवून ज्यावेळी पंकजा मुंडे समर्थक आपला राग व्यक्त करतात, त्यावेळी ते प्रवीण दरेकरांना पंकजांपेक्षाही मोठे मानतात असाच त्याचा अर्थ असतो. एकीकडे पंकजा मुंडे ' मी राष्ट्रीय राजकारणात आहे' असे सांगून अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनाही 'लोकल' म्हणून हिणवत असतात, मग आता त्यांचेच कार्यकर्ते प्रवीण दरेकरांचा ताफा अडवून त्यांना मोठेपण का देत आहेत ? पंकजा मुंडे यांना संघटनेत मोठे स्थान आहे, त्या पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत, त्या तुलनेत प्रवीण दरकरांकडे तर पक्षाचे कोणतेच पद नाही, मग त्यांचा ताफा अडवून साध्य काय होणार होते ? पण हे सारे कार्यकर्त्यांना सांगायचे कोणी ?
यापूर्वी देखील पंकजा मुंडे समर्थकांच्या अशाच उतावीळपणाची  किंमत थेट पंकजा मुंडेंना भोगावी लागली आहे. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान बीडच्या शासकीय विश्रामगृहात जे काही घडले ते कोणालाच शोभणारे नव्हते. मात्र तेथील मानापमान नाट्यानंतरच परळी विधानसभेत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाची चव चाखावी लागली होती हे विसरून चालणार नाही. कोणताही नेता आपल्या जिल्ह्यात येत असेल तर त्याचा सन्मान राखण्याची जबाबदारी त्या जिल्ह्याची आणि त्या जिल्ह्याच्या नेत्यांची असते. आपल्या जिल्ह्यात आले म्हणून जर आपण राग व्यक्त करण्यासाठी त्यांचा ताफा अडविणार असू तर हे राजकीय पोक्तपणाचे लक्षण नक्कीच नाही.

पंकजा मुंडेंवर अन्याय झालाय असे जर त्यांच्या समर्थकांना खरेच वाटत असेल तर तो राग व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. जो पक्ष आपल्या नेत्याला अडवितो, त्या पक्षाची अडवणूक करण्याचे मार्ग निवडणुकीच्या मांडवातून जात असतात. मात्र पंकजा मुंडे समर्थकांना हे समजून घ्यायचे नसते. मुळात या साऱ्या संघर्षात आम्ही काही तरी करीत आहोत हे दाखविण्यासाठीच असले उद्योग होतात आणि त्याची किंमत मात्र नंतर नेत्यांना चुकवावी लागते. कार्यकर्ता म्हणून राग असणे आणि आपल्या नेत्यावर अन्याय झालाय ही भावना निर्माण होणे साहजिक आहे, पण राजकारणात भावना व्यक्त करण्याचा मार्ग चुकला की,भल्याभल्यांची कोंडी होत असते. आणि जिथे मुळात पंकजा मुंडे कोणती भूमिका घ्यायला तयार नाहीत,तेथे समर्थकांनी उतावीळपणा करून काय उपयोग ? उद्या यातीलच काही समर्थकांना पुन्हा दरेकरांच्याच दारात जाण्याची वेळ येऊ नये, कारण भाजपसारख्या पक्षात कधी काय होईल याचा नेम नसतो. एकेकाळी बीड जिल्ह्यात ज्या देवेंद्र फडणवीसांची कोणी दखल देखील घेत नव्हते, तेच फडणवीस आज मुंडे समर्थकांना जेरीस आणीत आहेत, त्यामुळे राजकारणात वेळ महत्वाची असते आणि भावनांवर नियंत्रण असणे देखील.

Advertisement

Advertisement