बीड : अवैध गर्भपात प्रकरणातील आतापर्यंतची मुख्य आरोपी असलेली मनिषा सानप ही अंगणवाडी सेविका कारागृहात आहे. गर्भपात करणारी सीमा डोंगरे हिने आत्महत्या केली. तर मुख्य आरोपी म्हणजे गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर फरार होता. त्याच्या औरंगाबादेतून मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. याबाबत पोलिसांनी अद्यापही अधिकृत जाहिर केले नसले तरी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे याप्रकरणाची माहिती देणार असल्याचे समजते.
शीतल गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात पिंपळनेचे उपनिरीक्षक एम.एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबुराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यातील सीमा हिने पाली येथील तलावात आत्महत्या केली. इतर पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मनीषा कारागृहात आहे, तर इतरांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.