बीड दि.25 (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील देवस्थान जमिनीचे घोटाळे समोर येत असतानाही महसुल विभागाकडून पोलीसांना हवे ते सहकार्य केले जात नाही. गुन्हे दाखल करण्यासाठी एक महसुल अधिकारी प्राधिकृत करावा या मागणीकडे जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत. या बाबी समोर आल्यानंतर महसुल विभाग सहकार्य करणार नसेल तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचे सुतोवाच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर बुधवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत झिरवाळ यांनी जिल्हाधिकार्यांना हे निर्देश दिल्याचे सांगितले जाते.
बीड जिल्ह्यातील विविध विषयांवर आ.प्रकाश सोळंके, आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात बैठक लावण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील इतर अधिकार्यांनाही पाचारण करण्यात आले होते. तर आ.सोळंके, आ.क्षीरसागर यांच्यासह महेबुब शेख यांचीही बैठकीत उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्ह्यातील इनामी आणि देवस्थान जमिन घोटाळ्या बाबत चर्चा झाली. अनेक देवस्थानच्या जमिनी हडपण्यात आल्या आहेत. मात्र महसुल विभागाकडून वेळेवर कागदपत्रे मिळत नाहीत, माहिती मिळत नाहीत. गुन्हे दाखल करायचे तर महसुल विभाग अधिकारी प्राधिकृत करत नाही असा अहवालच या संदर्भातील एसआयटीच्या वतीने बैठकीत मांडण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घेतल्यानंतर महसुल विभाग सहकार्य करणार नसेल तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे द्यावी लागेल अशी तंबी विधानसभा उपाध्यक्षांनी बीडच्या जिल्हाधिकार्यांना दिल्याची माहिती आहे. यावर दोन दिवसात महसुल विभागाकडून गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी प्राधिकृत केला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले. यामुळे आता बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि इनामी जमीन घोटाळ्यातील कारवायांना पुन्हा एकदा वेग येईल असे अपेक्षित आहे.