मुंबई :अतिवृष्टी आणि पूर यामुळे जी आपत्ती आली त्या आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली. दिवळीच्या आधी सगळ्यांना मदत मिळणार असंही त्यांनी म्हटलं आहे. फळपीक नुकसानग्रस्तांसाठी हेक्टरी २५ हजारांची मदत केली जाणार. रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिरायत आणि बागायत नुकसानग्रस्तांसाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या हक्काचे ३८ हजार कोटी केंद्राकडे प्रलंबित आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकूण केंद्राकडून येणं ३८ हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत.अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. या आपत्तीत १० हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. पैशाची ओढाताण आहे,पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी ६ हजार ८०० रुपय प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.