Advertisement

आवाज वाढव डीजे तुला...

प्रजापत्र | Tuesday, 24/05/2022
बातमी शेअर करा

बीड : कोणाचे लग्न, कोणाचा वाढदिवस तर आणखी काही, मूठभर बड्या धेंडांच्या मनोरंजनासाठी सध्या संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरु आहेत. मध्यरात्री उशिरापर्यंत चौकाचौकात वाजणारे फटाके आणि कानफाडू आवाजात मध्यरातरुणी देखील धडाडणारा डीजे यामुळे बीड जिल्ह्यातील प्रत्येक शहरात नागरिकांचे बेहाल होत आहेत.

आपल्या कार्यक्रमांचा जल्लोष आणि आनंद साजरा करण्याचा अधिकार सर्वांना आहे , मात्र हे करताना इतरांची गैरसोय होणार नाही आणि नियमांची पायमल्ली होणार नाही हे देखील प्रत्येकाने पहिले पाहिजे. मात्र सध्या जिल्ह्यात मोठ्या घरच्या आणि राजकीय आशीर्वाद असलेल्या बड्या धेंडांनी मद्यरात्री फटाके आणि डीजे वाजविण्याचा सपाटाच लावला आहे. कधी कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तर कधी आणखी काही कारण सांगत, कोणाच्या लग्नाच्या निमित्ताने फटाके आणि डीजे वाजविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. शहराच्या कोणत्याही चौकात ही टगेगिरी करणारी मंडळी एकत्र जमून अर्ध्यारात्री शहराची शांतता भंग करीत आहेत. कमीअधिक फरकाने हे लोन बीड जिल्ह्याच्या सर्वच शहरात पोहचले आहे. यामुळे नागरिकांची मात्र झोप उडत आहे. तसेच अनेक घरांमध्ये वृद्ध, रुग्ण , विद्यार्थी आहेत त्यांचे हाल होत आहेत.

यासाऱ्या प्रकाराकडे पोलिसांनी देखील लसख देण्याची आवश्यकता आहे. मात्र अशा कोणत्याच प्रकारावर फारशा कारवाया होताना दिसत नाहीत. कोणी पोलिसांकडे तक्रार केली तरी त्याकडे कानाडोळा करण्याचे प्रकार घडत आहेत. अनेकदा तर पोलिस ठाण्यांपासून हाकेच्या अंतरावर हे सारे प्रकार सुरु असतात, मात्र तरीही स्थानिक पोलीस हे थांबविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

 

करणार कारवाई

मध्यरात्री फटाके वाजविणे, मोठ्या आवाजात डीजे वाजविणे हे सारे प्रकार भयंकर आहेत. आम्ही यापूर्वीही अशा प्रकारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आता पुन्हा सर्व पोलीस ठाण्यांना यासंदर्भात कळवू आणि जे कोणी असले उद्योग करून शहराची झोप उडवीत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल .

सुनील लांजेवार

अप्पर पोलीस अधीक्षक, बीड

 

पोलिसांनी पायबंद घालावा

रात्री अपरात्री फटाके वाजविणे, डीजे वाजविणे हे मनमानीपणाचे आहे आणि कायद्याचे देखील उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाने आवाजावर मर्यादा घातलेल्या आहेत. त्यामुळे कायद्याचे आणि नियमांचे पालन होईल हे [पोलिसांनी पाहायला हवे. अश्या प्रकारांना पपोलीसांनी पायबंद घालावा यासाठी मी स्वतः निवेदन देणार आहे.

डॉ. गणेश ढवळे , सामाजिक कार्यकर्ते, बीड

 

Advertisement

Advertisement