दिल्ली : देशात अनलॉक पाचचा टप्पा सुरु असताना नागरिकांचे लक्ष करोना व्हायरसला रोखणाऱ्या लशीकडे लागले आहे. सध्याच्या घडीला लस हाच या आजाराला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. दरम्यान ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने गुरुवारी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी करायला परवानगी दिली आहे.
कोव्हॅक्सीन’ ही स्वदेशी लस आहे. काही किरकोळ बदल करुन, डीजीसीआयने लशीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. कंपनीने फेज एक आणि फेज दोन चाचणीचा डाटा तसेच प्राण्यांवरील चाचणीचा डाटा डीजीसीआयच्या तज्ज्ञांच्या समितीसमोर सादर केला. लशीची परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी तिसऱ्या फेजच्या चाचणीची परवानगी देण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर केला. लस मानवी शरीरासाठी सुरक्षित आहे का ? हे तपासण्यासाठी तिसऱ्या फेजमध्ये हजारो स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येते.