Advertisement

केतकी चितळेचा गेवराईत प्रतिकात्मक दहावा,पोलिसातही तक्रार

प्रजापत्र | Sunday, 15/05/2022
बातमी शेअर करा

गेवराई-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या सिनेअभिनेत्री केतकी चितळे हिला रविवारी (दि.१५) न्यायालयासमोर हजर केले असता १८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील गेवराईत केतकी चितळेचा प्रतिकात्मक दहावा घालत राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करून केतकीच्या प्रतिमेला काळे फासले. तसेच गेवराई पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हाही दाखल केला. 

 

          सिनेअभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर राज्यभरातून सर्वच पक्षांनी केतकीच्या या वर्तवणुकीचा निषेध नोंदवला. राज्यभरात अनेक ठिकाणी केतकी चितळे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आज केतकीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दुसरीकडे केतकी हिने ती पोस्ट आपली नाही, कॉपी करून टाकली, मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे, असं सांगत पोस्ट डिलिट करणार नसल्याचे न्यायालयात म्हटले. दुसरीकडे केतकी विरोधात राज्यभरात राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक होताना दिसून येत आहेत. बीड जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटत आहेत. दोन दिवसांपूर्वीच समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केतकी विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून केतकीचा निषेध केला जात आहे. गेवराईमध्ये गोदावरी पात्रात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकीचा दहावा घालत निषेध नोंदवला. तिच्या छायाचित्राला काळे फासले.

Advertisement

Advertisement