Advertisement

बीडचे भूषण असलेल्या नाट्यगृहाच्या 'उत्कर्षाला' बट्टा लावणारांवर हवी कारवाई

प्रजापत्र | Wednesday, 11/05/2022
बातमी शेअर करा

बीड-'महाराष्ट्रात एकही जिल्ह्याच्या ठिकाणी असे नाट्यगृह नाही' अशा भावना ज्या बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाबद्दल राज्यभरातील कलाकारांकडून ऐकू यायच्या त्या नाट्यगृहाला सध्या उकिरड्याचे स्वरूप येत आहे. तुटलेल्या खुर्च्या, कुरकुरणारा मंच, बंद पडलेली शीतकरण यंत्रणा आणि 'सारे काही बाहेरून आणा' म्हणणारी व्यवस्था, एकेकाळी जी वास्तू बीडचे भूषण होती, त्या वस्तूचा 'उत्कर्ष' होण्याऐवजी त्या वस्तूला बट्टा लावण्याचे काम सध्या नगरपालिका प्रशासन करीत आहे. बीडच्या वैभवाला बट्टा लावणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करून नाट्यगृहाला गतवैभव मिळवून द्यावे अशी मागणी कलारसिकांकडून होत आहे.

           बीडमध्ये २००७ मध्ये नगरपालिकने यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ज्यावेळी नाट्यगृह सुरु केले,त्यावेळी ती राज्यातील एक 'भूषणावह'वास्तू ठरली होती. राज्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून ज्यावेळी कलाकार बीडला यायचे आणि येथील नाट्यगृह पाहून तोंडात बोटे घालायचे, बीडसारख्या ठिकाणी असे नाट्यगृह असेल याची कल्पना त्यांना करवत नसायची आणि अशी वस्तू पाहून होणार आनंद ते भरभरून व्यक्त करायचे, त्यावेळी बीडकरांचा ऊर देखील भरून यायचा.मात्र आज त्याच नाट्यगृहाची अवस्था पाहवत नाही अशी परिस्थिती आहे. खुर्च्या तुटत आहेत, मंच कुरकुरत आहे, मंचावर जाताना कोणत्या क्षणी पायरी तुटेल अशी परिस्थिती असून अक्षरशः जीव मुठीत धरून यावरून चालावे लागते. एकेकाळी ज्याच्या ध्वनी यंत्रणेची, प्रकाश योजनेची सर्वत्र चर्चा व्हायची, त्या यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत.

भौतिक सुविधा वाढल्या नाहीत हे एकवेळ ठीक, मात्र आहे ते देखील राखता येत नसल्याची परिस्थिती आहे.येथे ना नियमित स्वच्छता होते, ना डागडुजी, नाट्यगृहाला कोणी वाली उरला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आणि याकडे लक्ष द्यायला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना वेळ नाही. शहराच्या भूषणावह वास्तूंमध्ये भर घालता येत नसेल तर पालिका प्रशासनाने किमान त्या वास्तूंच्या 'उत्कर्षाला' बट्टा तरी लावू नये अशी अपेक्षा कलारसिक व्यक्त करीत आहेत .

 

 

 

केवळ भाडे वसुलीसाठीच आहे का नगरपालिका ?

या नाट्यगृहामध्ये ज्यावेळी प्रचंड सुविधा होत्या,त्यावेळी नाट्यगृहाचे भाडे सामान्यांच्या आवाक्यात होते, आता मात्र सुविधांच्या नावाने बोंब आहे.ज्याने नाट्यगृह किरायाने घेतले त्याने सारे काही बाहेरून आणायचे, आणि नगरपालिका प्रशासनाने मात्र केवळ भाडे वसुलीचे 'गुत्ते' घेतल्यासारखे वागायचे अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अगदी राज्य नाट्य स्पर्धा असतील किंवा इतर कार्यक्रम,त्यांना आता नाट्यगृह परवडत नाही अशी परिस्थिती आहे. मग यासाठीच विकासाचा हा अट्टाहास केला होता का ? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे. आणि पदाधिकारी म्हणवणारानी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारण्याची गरज आहे.

Advertisement

Advertisement