Advertisement

१० गावाचं गावपण संपवून केसापुरी नगरपंचायतीचा घाट

प्रजापत्र | Wednesday, 11/05/2022
बातमी शेअर करा

माजलगाव : एकीकडे पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायती बळकट केल्या जात असतानाच बीड जिल्ह्यात मात्र १० गावांना एक करून त्यांची एकत्रित नगरपंचायत करण्याचा अफलातून घाट सध्या आ. प्रकाश सोळंकेनी घातला आहे. आ. सोळंकेंच्या पत्रानुसार नगरविकास मंत्र्यांनी माजलगाव तालुक्यात केसापुरी नगरपंचायत स्थापन करता येते का याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला आहे.

एखाद्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या वाढली तर त्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची प्रक्रिया आतापर्यंत केली जात होती. नगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ देखील सर्वांना माहित होती. मात्र आता १० गावे एकत्र करून त्यांची नगरपंचायत करण्याचा नावाचं फंडा मजळगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी काढला आहे. केसापुरी ग्रामपंचायतीसह पुनर्वसित भागातील १० ग्रामपंचायतींना एकत्र करून केसापुरी नगरपंचायत करा असे पत्रच आ. प्रकाश सोळंके यांनी दिले आहे. त्यावर नगरविकास मंत्र्यांनी आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मागितला आहे . माजलगाव तालुक्यात माजलगाव ही नगरपालिका आहे. प्रस्तावित केसापुरी नगरपालिकेत ज्या गावांचा समावेश आमदारांना करायचा आहे, त्या ग्रामपंचायती माजलगावच्या सीमेवर आहेत. मग अशावेळी आमदारांनी केसापुरी नगरपंच्यातीचा अट्टाहास का सुरु केला आहे असाही प्रश्न या निमित्ताने उस्थित होत आहे.

 

या ग्रामपंचायतींच्या समावेशाचा प्रस्ताव

प्रस्तावित केसापुरी नगरपंचायतीमध्ये केसापुरी , भाटवडगाव , ब्रह्मगाव , चिंचगव्हाण , खानापूर , देवखेडा , पुनंदगाव , रेणापुरी , शेलापुरी , नागझरी , नांदूर आदी गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. काही दिवसांपूर्वी याच संदर्भात ग्रामस्थांची एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी अनेकांनी अशा एकत्रित नगरपंचायतीला विरोध केला होता.

 

निधी होणार कमी

आजघडीला पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना वित्त आयोगामार्फत मोठ्याप्रमाणावर निधी थेट मिळतो, यासाठी कोणत्याही पुढाऱ्याचे उंबरे झिजवावे लागत नाहीत. तसेच नरेगासारख्या योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर कामे करता येतात, त्याचा विचार केला तर या सर्व गावांची एक नगरपंचायत केली तर विकास कामांचा निधी तुलनेने कमी होणार आहे. तरीही आमदार हा हट्ट कशासाठी करीत आहेत हा प्रश्न आहे.

Advertisement

Advertisement