Advertisement

गृह, वाहन कर्ज महागणार, ईएमआयमध्ये मोठी वाढ

प्रजापत्र | Wednesday, 04/05/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-देशातील महागाई दर सातत्याने वाढत आहे. या महागाईचा फटका आता देशातील कर्जदारांना देखील बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रेपो दर 4% वरुन वाढवून 4.40% करण्यात आला आहे. म्हणजेच तुमचा ईएमआय आणि कर्ज महागणार आहे.

 

 

2 आणि 3 मे रोजी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तातडीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पतधोरण आढावा बैठक दर दोन महिन्यांनी घेतली जाते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक गेल्या महिन्यात ६-८ एप्रिल रोजी झाली होती. पुढील बैठक जूनमध्ये होणार होती.पतधोरण आढावा बैठक वास्तविक दर दोन महिन्यांनी होते. या आधी ६ ते ८ एप्रिल रोजी बैठक झाली होती. तर या आधी 22 मे 2020 रोजी रेपो दरात बदल करण्यात आला होता. तेव्हापासून रेपो दर 4% या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आहेत. मात्र, आता रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.


रेपो दर म्हणजे काय?
ज्या दराने बँकांना आरबीआयच्या वतीने कर्ज दिले जाते, त्याला रेपो दर असे म्हटले जाते. तर बँकांनी त्यांच्याकडील पैसे आरबीआयकडे ठेवले तर त्या बँकांना रिझर्व्ह बँक जे व्याज देते त्याला रिव्हर्स रेपो दर असे म्हटले जाते.

 

 

आरबीआयच्या निर्णयामुळे बाजाराची धारणा नकारात्मक
रिझव्‍‌र्ह बँकेने अशाप्रकारे अचानक व्याजदरात केलेली वाढ बाजारासाठी आश्चर्यकारक होती. या निर्णयानंतर सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरून 55,700 च्या जवळ पोहोचला. बाजारासाठी हे अत्यंत वाईट असल्याचे बाजार तज्ज्ञ अजय बग्गा यांनी सांगितले. आरबीआयने असा अचानक निर्णय घ्यायला नको होता. महागाई वाढल्यामुळे आरबीआयला हा निर्णय घ्यावा लागल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ वृंदा जहागीरदार यांनी सांगितले.

 

 

वाढत्या महागाईमुळे आरबीआय चिंतेत
रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलापासून धातूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असताना आरबीआयच्या पत धोरण समितीची (एमपीसी) तातडीची बैठक झाली. अशा स्थितीत जगभर महागाई ही मोठी समस्या बनली आहे. मागील बैठकीत, RBI ने पहिल्या तिमाहीत महागाई दर 6.3%, दुसऱ्या तिमाहीत 5%, तिसऱ्या तिमाहीत 5.4% आणि चौथ्या तिमाहीत 5.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

 

 

महागाईने RBI ची 6% वरची मर्यादा ओलांडली
एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई मार्चमध्ये 6.95% पर्यंत वाढली होती. अन्नधान्य महागाई 5.85% वरून 7.68% पर्यंत वाढली. हा सलग तिसरा महिना होता जेव्हा महागाई दराने RBI ची 6% वरची मर्यादा ओलांडली. किरकोळ महागाई फेब्रुवारी 2022 मध्ये 6.07% आणि जानेवारीमध्ये 6.01% नोंदवली गेली. मार्च 2021 मध्ये किरकोळ महागाई 5.52% होती.

Advertisement

Advertisement