किल्लेधारूर दि.२४ (वार्ताहर)-तालुक्यात गेल्या तीन दिवसांत बाल हक्क संरक्षण समितीला दोन बाल विवाह रोखण्यात यश आले असून या दोन्ही बाल विवाहबाबत लग्नापूर्वीच कल्पना मिळाल्याने योग्य दक्षता व पाऊले उचलत चाईल्ड लाईन व सामाजिक संस्थांच्या मदतीने हे बालविवाह रोखले आहेत.
सध्या विवाह समारंभाची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात बालविवाह उरकले जातात. चाईल्ड लाईनने दोन दिवसापूर्वी धारूर शहरात एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची खबर मिळताच धारूर पोलीस बाल कल्याण संरक्षण समिती व सामाजिक संस्थाचे मदतीने रोखला होता. संबंधितांना बाल हक्क संरक्षण समितीसमोर हजर करून रितसर कार्यवाही करण्यात आली होती. ही घटना ताजी घटना असताना तालुक्यात अंजनडोह येथे दि.२४ एप्रिल रोजी बाल विवाह होणार असल्याची खबर एक दिवस अगोदर चाईल्ड लाईन संस्थेला मिळाली. काही सामाजिक संघटनांनाही सदर माहिती मिळाली, मुलगी अंबाजोगाई येथील असल्याचे समजले. या संस्थानी धारूर पोलीस, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय व ग्रामसेवक यांचे मदतीने या दोन्ही कुंटूंबास भेटून सर्व बाजू समजून सांगितल्या. या घटनेत मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्या वर या दोन्ही कुंटूंबास बालहक्क संरक्षण समिती समोर रविवारी हजर करण्यात आले. सर्व कायदेशीर कारवाई करून हा बालविवाह थांबवण्यात यश आले. निर्धार स्वयंसेवी संस्थेने यात महत्वाची भुमिका पार पाडली. शासन पातळीवर अल्पवयीन मुली व मुलांची लग्न होवू नयेत म्हणून मोठे प्रयत्न होत असताना धारुर तालुक्यात मात्र अल्पवयीन विवाहाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. गांवदरा, चोरांबा, धारुर शहरानंतर आता अंजनडोह येथे प्रकार उघडकीस आला आहे. असे प्रकार उघडकीस येवून ही अल्पवयीन मुला मुलींचे विवाह मंदिरात सहजपणे उरकले जात असल्याचे दिसत आहे.