Advertisement

संतप्त वाहनधारकाने गाढवाला बांधून काढली दुचाकीची धिंड

प्रजापत्र | Sunday, 24/04/2022
बातमी शेअर करा

किरण धोंड
परळी दि.२४-पेट्रोलच्या किंमती आवाक्याबाहेरचे जात असल्याने सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देऊन चालना देण्याचे धोरण अवलंबिले जात आहे.परंतु सरकारच्या या धोरणांना ओला कंपनीकडून हरताळ फासला जात आहे.परळीतील ग्राहक सचिन गित्ते यांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून खरेदी केलेली इलेक्ट्रिक दुचाकी अवघ्या सहा दिवसात बंद पडली ती काही केल्याने पुन्हा सुरु झालीच नाही.कंपनीकडून कसलाच प्रतिसाद परत येत नसल्याने त्रस्त ग्राहक गित्ते यांनी सदरील बंद पडलेली दुचाकी गाढवाला बांधत परळीतील रस्त्यावरुन ओढत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला व ओला कंपनीच्या या दुचाकी घेवु नयेत असे आवाहन केले.

 

    परळी येथील व्यापारी सचिन गित्ते यांनी दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी २० हजार रुपये भरत ओला कंपनीची ऑनलाईन बुकींग केली.२१ जानेवारी २०२२ रोजी उरलेले ६५ हजार रुपये भरल्यानंतर त्यांना २४ मार्च रोजी सदरील दुचाकी गित्ते यांच्या ताब्यात देण्यात आली.सहा दिवसानंतर ही दुचाकी बंद पडली.त्यानंतर कंपनीकडे संपर्क साधला कंपनीचा मेकॉनिक येऊनही दुचाकी सुरु झाली नाही.कंपनीकडून हजारो गाड्यांची विक्री होत असताना कुठेच डिलर अथवा तालुका,जिल्हा,विभागीय स्तरावर शोरुम नसल्याने सचिन गित्ते कस्टमर केअर नंबरवर वारंवार फोन करुनही उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.पैसे देवुन घेतलेली दुचाकी बंद पडल्याने व कंपनीकडून कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्रस्त झालेल्या सचिन गित्ते यांनी रविवारी (दि.२४) सदरील बंद पडलेली दुचाकी गाढवाने ओढत गांधीगिरी आंदोलन केले.गाढवाच्या पाठीवर ओला कंपनीचा निषेध असलेले फलक लावुन ओला या कंपनीपासून सावध रहावे,ओला कंपनीच्या दुचाकी खरेदी करु नका असे आवाहन त्यांनी शहरभर फिरून केले.
 

Advertisement

Advertisement