Advertisement

भाववाढ आणि सुरक्षा कायदा झाल्याशिवाय ऊसतोड सुरूच होणार नाही : आ. धस

प्रजापत्र | Wednesday, 21/10/2020
बातमी शेअर करा

ऊसतोड कामगारांची लढाई ही भांडवलशाही आणि शोषणाविरुद्धची वंचितांची लढाई आहे ४-५ % लोक आणले म्हणजे ऊसतोड सुरु होईल असे कोणी समजू नये. यावेळी भाववाढ आणि ऊसतोड कामगारांसाठी सुरक्षा कायदा झाल्याशिवाय ऊसतोडणी सुरूच होणार नाही  अशी भूमिका ऊसतोडणी कामगार संपाचे नेते आ. सुरेश धस यांनी घेतली आहे. त्यांच्याशी केलेली ही बातचीत.
 

प्रश्न : ऊसतोडणी कामगारांचा संप सुरु असला तरी अनेक कारखान्यांचे बॉयलर सुरु झाले आहेत, त्याकडे कसे पाहता ?
आ. धस : बॉयलर पेटवावेच लागतात , काही दुरुस्त्या असतात, लोकांना कारखाना सुरु होणार आहे हा विश्वास द्यायचा असतो. मात्र बॉयलर पेटला म्हणजे कारखाने सुरु झाले असे नाही. काही कारखानदारांनी, वाहतूक ठेकेदारांनी काही कामगारांना बेमालूमपणे उचलून नेले आहे, हे संप फोडण्याचे षडयंत्र आहे. पण आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. आमच्या मागण्या मान्य  झाल्याशिवाय ऊसतोडणी सुरु होऊ देणार नाही. आम्हाला कोणाच्या नादी लागायचं नाही, पण कोणी नादी लागलं तर आम्ही पण सोडणार नाहीत.

 

प्रश्न : आ. सुरेश धस अचानक ऊसतोडणी कामगारांमध्ये कसे आले? आपला ऊसतोडणी कामगारांशी काय संबंध असा प्रश्न विचारला जातोय .
आ. धस : असा प्रश्न विचारणारांनी जरा इतिहास तपासून पाहावा. मी आज नाही बोलत , १९९७ पासून मी या ऊसतोड कामगारांशी संबंधित आहे. मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी ऊसतोड कामगारांच्या घरकुलाचा प्रश्न घेऊन गोपीनाथराव आणि मी तत्कालीन मंत्री अनंत कुमारांना भेटलो होतो. तो प्रश्न त्यांनी राज्याकडे पाठविला , तो सुटला नाही. पण तेव्हा पासून आम्ही यात आहोत. गोपीनाथरावांनी मिळवलेली पहिली ३५ % दरवाढ , त्यानंतरची ७० % वाढ, त्यावेळी तर मी राष्ट्रवादीत होतो, पण मी नेहमी ऊसतोड कामगारांच्या बाजूनेच बसत आलो . फक्त त्यावेळी आम्ही सर्वांनी गोपीनाथरावांचेच नाव पुढे केले होते, ते भांडत होते, म्हणून आम्ही काही बोलत नव्हतो. २०१४ पर्यंत गोपीनाथरावच सर्व पाहायचे , पण त्यावेळच्या सर्व प्रक्रियेत मो होतो. २०१४ ला मी पराभूत झालो होतो, पंकजा मुंडे लवादाच्या अध्यक्ष झाल्या , त्यावेळी संघटनांना माझी गरज वाटली नव्हती , म्हणून मी प्रक्रियेत नव्हतो. अंतरीमच्या वेळी तर बैठकच झाली नाही. पण मी सुरुवातीपासून या प्रक्रियेत आहे.

 

प्रश्न : म्हणजे ऊसतोड कामगारांचं नेतृत्व पंकजांकडून आ. धसांकडे वळ्तय का ?
आ. धस : हे सारं कपोलकल्पित आहे. मला नेता होण्याची घाई नाही . मी कार्यकर्ताच आहे. मला अद्यापही कोणत्याही बैठकीचं निमंत्रण नाही. पण जिल्ह्यातल्या दोन संघटनांनी  (त्यातील एक गोपीनाथरावांच्या नावाची आहे )माझ्या नावाचा ठराव दिला आहे. त्यामुळे साखरसंघाने बोलावलं तर जाईल , पण बिन बुलाये मेहमान होणार नाही.

 

प्रश्न : संपाचं भवितव्य काय ?
आ. धस : संप कडकच होणार आहे. ४-५ % लोक आणली म्हणजे साखरकारखानदारी सुरु होत नसते . भाववाढ आणि कायदा झाल्याशिवाय यावर्षी ऊसतोडणी सुरु होणार नाही.

 

प्रश्न: सर्व संघटना एकत्र राहतील का ?
आ. धस : सर्व संघटना भाववाढीच्या प्रश्नावर एकत्र येतच असतात.पूर्वी  चर्चेच्यावेळी साखरसंघाकडून शरद पवारांचे नाव यायचे आणि कामगारांकडून गोपीनाथरावांचे . चर्चेतून निर्णय झाला नाही तर लवाद नेमला जायचा, त्याचे अध्यक्ष पूर्वी गोपीनाथराव असायचे. मागच्यावेळी पंकजा होत्या. मात्र मागच्या काळात एकतर २०१४ चे वर्षच गायब केले. त्यानंतर ३ वर्षाचा करार ५ वर्षाचा केला. अशी ६ वर्ष, म्हणजे आमची एक भाववाढच गायब केली आहे. त्यामुळे कामगार, मुकादम यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे फाटाफूट होणार नाही.

 

प्रश्न : साखर संघाच्या संचालक  कामगारांच्या नेत्या कशा असा प्रश्न उपस्थित केला जातोय ?
आ. धस : त्यावर आताच काही बोलण्याची गरज नाही. मी काही भाष्य करू इच्छित नाही. जेव्हा लवाद नेमण्याची वेळ येईल त्यावेळी उत्तर देता येईल. पूर्वी देखील गोपीनाथरावांना सर्वांचाच पाठिंबा असायचा असे नाही. आम्हाला गोपीनाथरावांचा लवाद मान्य  नाही असे म्हणणारे देखील होते. पण आम्ही सर्वांना सांगायचो . आणि गोपीनाथराव देखील सर्व संघटनांना एकत्र विचारायचे, कुठपर्यंत ताणायच , कुठे थांबायचं यावर चर्चा करायचे,आणि जी कामगारांची मागणी असेल तीच चर्चेत पदरात पडून घ्यायचे. त्यामुळे नेतृत्वाचा विषय जेव्हा लवाद नेमला जाईल तेव्हाचा आहे.

 

प्रश्न : आपण यात राज्यभर फिरताय ?
आ. धस : होय , पक्ष म्हणूंन भाजपने या मागणीला पाठिंबा दिला आहे. इतर पक्षांनी देखील द्यावा, राष्ट्रवादीने, काँग्रेसने केवळ कारखानदारांचीच बाजू का घ्यायची ? गोपीनाथराव हे प्रश्न मांडायचे, ते आज आम्ही मांडत आहोत.

 

प्रश्न : आपण अनेक संघटनांना एकत्र कस केलं ?
आ. धस : संघटना भावाढीसाठी एकत्र येतच असतात, पण यावेळी मी जरा लवकर एकत्र आणलं. आपण समान मागण्यांवर एकत्र येऊ म्हणालो. चर्चा केली, प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली आणि सर्वांच्या परवानगीनेच राज्यातील १६-१७ जिल्ह्यात जाऊन आलो. मुळात हि लढाई वेगळी आहे.ही  भांडवलशाहीच्या विरोधात वंचितांची लढाई आहे.

 

प्रश्न : या प्रश्नाच्या माध्यमातून आ. सुरेश धस यांचा राजकीय परीघ विस्तारतोय का ?
आ. धस : माझ्यासाठी हा विषय राजकीय परिघाचा नाही. राजकीय जोडे बाहेर ठेवून आम्ही हे आंदोलन उभे केले आहे. यात अनेक विचारांचे लोक आहेत . डाव्या विचारांचे आहेत. डी. एल . कराड आहेत, राजन क्षीरसागर आहेत. ते काम करत आहेत, त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. बीड जिल्ह्यात सय्यद रज्जाक, दत्ता डाके , मोहन जाधव काम करत आहेत . नवीन लोक येत आहेत. मुकादम बदलतोय, पूर्वी तो फेट्यावाला , धोतरावाला , इजारीवाला होता आता जिनवाला झालाय. त्यामुळे यात राजकारण नाही, पण भाववाढ आणि कायदा हे महत्वाचे विषय आहेत.

 

प्रश्न : कायद्याचा आग्रह कशासाठी ?
आ. धस : आज कामगार , मुकादम यांच्या अनेक अडचणी आहेत. मुकादमाकडे कोणाची नोंदणी नाही, त्यामुळे काही लोक याचा गैरफायदा घेतात . कामगार सुट्टा खेळतो, तीन मुकादमांकडून उचल घेतो आणि चौथ्यासोबत जातो. मुकादमच अडचणीत येतो. एखादा कारखाना बंद पडला तर मुकादम अडचणीत येतो. कामगारांची देखील नोंदणीच नसल्याने त्याच्याही अडचणी आहेत. म्हणून आम्ही कायदा मागतोय . मोदी सरकारने आता जे कामगार कायदे केले आहेत, त्यातील तिसऱ्या कायद्यात स्थलांतरित कामगार म्हणून आम्हाला बसवा. सामाजिक सुरक्षा कायद्यात स्थान द्या . त्यात मुकदम , मुकडंदम , मुकरदम , टोळी, उचल, कामगार हे शब्द घ्या . त्यासोबतच आरोग्य , शिक्षण असे प्रश्न सोडवा. त्यासाठी कायदा आणि भाववाढ झाल्याशिवाय हा संप मिटणार नाही. 

 

Advertisement

Advertisement