Advertisement

बीड जिल्ह्यातील दीड लाख टन ऊसाचे परभणीत होणार गाळप

प्रजापत्र | Thursday, 21/04/2022
बातमी शेअर करा

बीड दि.20 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अतिरीक्त ऊसाचा प्रश्‍न गंभीर झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता प्रशासनाने हलचाली सुरु केल्या आहेत. जिल्ह्यातील माजलगांव आणि अंबाजोगाई या दोन तालुक्यातील सुमारे दीड लाख टन ऊसाचे गाळप आता परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर आणि लक्ष्मीनृसिंह साखर कारखान्यामार्फत केले जाणार आहे. तसेे आदेश राज्याच्या साखर संचालकांनी दिले आहेत.

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस अतिरीक्त रहात आहे. मे अखेर पर्यंत कारखाने चालल्यानंतरही जिल्ह्यात सुमारे 21 लाख मेट्रीकटन ऊस शिल्लक राहिल असा प्रशासनाचा अंदाज आहे. अतिरीक्त उसाच्या प्रश्‍नावर किसान सभेसह माध्यमांनी फार पूर्वीच आवाज उठविला होता.मात्र त्यावेळी प्रशासनाने हा विषय फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. आता मात्र परिस्थिती स्फोटक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आणि स्वत: विभागीय आयुक्तांनीच सुत्रे हाती घेतल्यानंतर सारे प्रशासन कामाला लागले आहे.

औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मागील महिन्यात मराठवाड्यातील अतिरीक्त ऊसाचा आढावा घेवून त्याच्या गाळपाचे नियोजन करण्यासंदर्भात साखर आयुक्तांशी पत्र व्यवहार केला होता. त्यानंतर बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी साखर संचालकांना पत्र देवून जिल्ह्यातील अतिरीक्त ऊसाचे इतर ठिकाणी गाळप करण्यासंदर्भात विनंती केली होती.

त्यानूसार आता माजलगाव तालुक्यातील 1 लाख मे.टन आणि अंबाजोगाई तालुक्यातील 25 हजार मे.टन ऊस गंगाखेड शुगर मार्फत गाळप करण्याचे तसेच माजलगाव तालुक्यातील 25 हजार मे.टन ऊस लक्ष्मीनृसिंह कारखाना परभणी यांच्या मार्फत गाळप करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

 

Advertisement

Advertisement