बीड : येथील पुरवठा विभागातून सुमारे ५ हजार रेशनकार्ड गहाळ झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणात कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तालयाने दिले होते, मात्र त्यात कसलीही कारवाई झाली नव्हती.आता या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तालयाने दिले आहेत. उपयुक्त वामन कदम यांनी हे आदेश दिले असून यामुळे महसूल वर्तुळात खळबळ माजली आहे.
बीडच्या पुरवठा विभागातील मनमानी कारभार नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. येथील प्रकरण थंड होत नाही तोच नवीन प्रकरण समोर येत असते.असाच पुरवठा विभागातून सुमारे ५ हजार शिधापत्रिका गहाळ झाल्याचे प्रकरण मागील वर्षी समोर आले होते. 'प्रजापत्र' ने सदरील प्रकार समोर आणल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती . या प्रकरणात गुन्हे दाखल करावेत अशी भूमिका सुरुवातीला तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सागरे यांनी घेतली होती. मात्र नंतर या प्रकरणात कोणताच गुन्हा दाखल झाला नाही, तर सदरील शिधापत्रिकांची 'ताळमेळ' जुळल्याचे सांगण्यात आले.
आता मात्र या प्रकरणात थेट गुन्हा दाखल करावा असे आदेश पुन्हा एकदा विभागीय आयुक्तालयाने दिले आहेत. पुरवठा विभागाचे उपायुक्त वामन कदम यांनी हे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अनेक अधिकारी आणि कर्मचारे अडचणीत येत आहेत.
--
पुरवठा अधिकाऱ्यांना मागविला खुलासा
बीड पुरवठा विभागातील शिधापत्रिका गहाळ प्रकरणात संबंधितांवर गुन्हा नोंदविला नाही म्हणून तत्कालीन प्रभारी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एस.के.मंदे यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यात कारवाई का केली नाही म्हणून त्यांचाही खुलासा मागवावा असेही निर्देश उपायुक्त वामन कदम यांनी दिले आहेत.
---
काय आहे प्रकरण ?
बीडच्या जिल्हा पुरवठा विभागातून सुमारे ५ हजार शिधापत्रिका गहाळ झाल्याचे ८ महिन्यांपूर्वी समोर आले होते. त्यावेळी पुरवठा विभागाने अंतर्गत चौकशी केली. त्यात सदर शिधापत्रिका बीडच्या तहसील कार्यालयाला देण्यात आल्याचे समोर आले. तसे रेकॉर्ड देखील समोर आले आणि बीडच्या नायब तहसीलदारांनी तसे चलन देखील बँकेत भरले. मात्र त्यानंतर त्या शिधापत्रिका ज्या रास्तभाव दुकानदारांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले, त्या दुकानदारांनी चौकशी समितीसमोर सदर शिधापत्रिका मिळाल्याचं नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्या शिधापत्रिका नेमक्या कोठे गेल्या याचे गौडबंगाल अद्यापही कायम आहे.
बातमी शेअर करा