बीड : एसटी कर्मचार्यांचा संप मिटला असून मागील आठवडाभरात बीड जिल्ह्यातील तब्बल 350 एसटी कर्मचारी कामावर परतल्याचे चित्र आहे. विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी याबाबत माहिती दिली असून गुरुवारी (दि.14) 39 चालक, 49 वाहक तर यांत्रिकी विभागातील 52 जणांनी कामावर येण्याचा निर्णय घेतला. दरम्यान एसटी कर्मचारी पुन्हा एकदा झपाट्याने कामावर परतू लागल्याने प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचार्यांनी विलनीकरणाच्या मागणीवर बेमुदत संप पुकारला होता. परिवहन मंत्र्यांनी महागाई भत्ते आणि पगार वाढ केल्यानंतर महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर काही कर्मचारी कामावर परतले होते. त्यामुळे बससेवा काही प्रमाणात सुरुही झाली होती. न्यायालयाने एसटी कर्मचार्यांना कामावर हजर होण्यासाठी 22 एप्रिल पर्यंत मुदत दिली असून त्यानंतर जे कर्मचारी कामावर परतणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारला मूभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी पुन्हा एकदा कामावर झपाट्याने परतू लागल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहायला मिळू लागले असून 8 ते 14 एप्रिल या कालावधीत तब्बल 347 कर्मचार्यांनी कामावर येण्याचा निर्णय घेतला असल्याचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी कळविले आहे. यामध्ये 137 चालक, 145 वाहक, यांत्रिकी विभागातील 63 तर प्रशासकीय विभागातील दोघांचा समावेश आहे.