मुंबई : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याचीही माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तातडीने त्यांना उपरासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल होत धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. धनंजय मुंडे हे सध्या 46 वर्षांचे आहेत. राज्य सरकारमधील एक धडाडीचा मंत्री आणि फर्डा वक्ता अशी धनंजय मुंडे यांची मुख्य ओळख आहे.
सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्याकाळच्या वेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवले जाणार आहे.