बीड - शहरातील एका शिक्षकाने ओला कंपनीच्या स्कूटरची ऑनलाईन बुकिंग केली. त्यानंतर त्यांच्याकडून सबसिडी मिळवून देण्याच्या नावाखाली १ लाख ५ हजार रुपये जमा करून घेण्यात आले. मात्र, त्यानंतरही अधिक रकमेची मागणी होऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे शिक्षकाच्या लक्षात आले आणि त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली.
रामराव श्रीपती मुंडे (रा. संत नामदेव नगर, धानोरा रोड, बीड) असे त्या फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी त्यांनी ऑनलाईन सर्च करून २७ मार्च रोजी ४९९ रुपये भरून ऑनलाईन बुकिंग केली. त्यानंतर २९ मार्च रोजी रामराव यांना दोन मोबाईलवरून कॉल आले आणि त्यांनी कागदपत्रे मागून घेतले. ते पाहून तुम्हाला २० हजार रुपये सबसिडी मिळेल असी बतावणी केली. त्यासाठी २५ हजार हजार रुपये बेंगलोर येथील खात्यावर जमा करून घेतले. असे वेळोवेळी सबसिडी देण्याच्या नावाखाली त्या भामट्यांनी विविध व्यवहारातून एकूण १ लाख ५ हजार रुपये रामराव यांच्याकडून जमा करून घेतले. त्यानंतरही गाडी वितरीत करण्यासाठी पूर्ण रक्कम जमा करावी लागेल त्याशिवाय सबसिडी मिळणार नाही असे सांगून आणखी २० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. रामराव यांना संशय आल्याने त्यांनी नकार देत आजवर जमा केलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र, त्या भामट्यांनी रक्कमही परत दिली नाही आणि रामराव यांचे कॉल घेणेही बंद केले. अखेर रामराव मुंडे यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दोन्ही मोबाईल क्रमांक धारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.