Advertisement

धारुर येथील पेट्रोल पंपावरुन चक्क ट्रकची चोरी

प्रजापत्र | Tuesday, 05/04/2022
बातमी शेअर करा

किल्ले धारूर दि.5 एप्रिल – धारूर येथील केज रोड वरील पेट्रोल पंपा वर लावलेला ट्रक चोरी करून पळवून नेत असताना ट्रक चोर जागरुक नागरिकांनी ट्रकसह पकडला आहे. या विरूध्द धारूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धारूर शहरातील केज रोड वरील पेट्रोल पंपावर (Petrol pump) लावलेला ट्रक क्रमांक एम एच 14 ए एस 70 71 दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान चोरीस गेला. ट्रक चोर अरूण लक्ष्मण पवार यांनी मोठ्या शिताफीने तो ट्रक बाहेर काढला व ट्रक केजच्या (Kaij) दिशेने घेऊन गेला.

 

केज येथे धारूर (Dharur) चौकात थांबलेले इंगळे यांनी हा रिकामा ट्रक पाहून त्यांना शंका आली. त्यांनी लागलीच ट्रक मालक चिंचपूर येथील लक्ष्मण अर्जून साखरे यांना संपर्क केला असता तुमचा ट्रक केज येते रिकाम्या अवस्थेत कोणी तरी अनोळखी व्यक्ती चालवत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की ट्रक धारूर येथील केज रोडवरील पेट्रोल पंपावर लावलेला आहे. त्यांना विश्वास बसला नाही. पेट्रोल पंपावर खात्री केली असता ट्रक चोरीला गेल्याचे लक्षात आले.

 

इकडे इंगळे यांनी त्या ट्रकचा पाठलाग करून ट्रक (Truck) ताब्यात घेतला व तो ट्रक चालवत असलेल्या ट्रक चालक अरूण लक्ष्मण पवार याला पकडून धारूर पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले आहे. भर दिवसा पेट्रोल पंपावरील ट्रक बाहेर काढून चोरी करण्याचा प्रयत्न झाला असल्याने वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत धारूर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास धारूर पोलिस निरीक्षक विजय आटोळे यांचे मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. गोंविद बास्टे हे करत आहेत.

 

या पूर्वीही धारूर शहर तसेच परिसरातून ट्रॅक्टर, ट्रक तसेच दुचाकी चोरी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र आज दि.5 मंगळवारी दुपारीच चक्क ट्रकच चोरीला गेल्यामुळे वाहनधारकात भितीचे वातावरण पसरले आहे. तीन दिवसांपुर्वीच शहरात मोटार सायकल चोरी व एक ठोक किराणा दुकानाचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे.

 

( Truck theft from petrol pump at Dharur; Thief with truck in police custody. )

Advertisement

Advertisement