ज्या महिलांमध्ये मी काम करते त्या महिलांसमोर अनेक अडचणी येतात. इतक्या अडचणींवर मात करून जर महिला उभ्या राहू शकतात तर आपण अडचणी येतात म्हणून काम थांबवलं नाही पाहिजे हे लक्षात येत गेलं. आणि मग येणार्या प्रत्येक अडचणींमधून काम करण्याची एक ऊर्जा मिळत गेली. रस्त्यात आलेल्या अडचणीत आमच्यासाठी नवचेतना ठरल्या. या शब्दात नवचेतना सर्वांगीण विकास केेंद्राच्या मनिषा घुले यांनी बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेला कामाचा जागर प्रजापत्रच्या मंचावर मांडला.
मनिषा घुले. ऊसतोड कामगार कुटुंबातली ही महिला. बचतगटांच्या माध्यमातून सारे लोक कोणत्या योजना मिळविता येतील इकडे पहात असताना कोणत्याही योजनेची वाट न पाहता या महिलेने बचत गटांमध्ये काम सुरू केले. योजनेचे नव्हे तर खर्या अर्थानं उपक्रम राबविणारे बचतगट निर्माण केले. या बचतगटांचा आकडा थोडाथोडका नाही तर जिल्ह्यात तब्बल 3 हजार बचतगटांच्या माध्यमातून मनिषा घुलेंच्या ‘नवचेतना’चं काम सुरू आहे. ऊसतोड कामगार महिलांच्या हातातला कोयता सुटला पाहिजे या हेतूने प्रेरित होवून मनिषा घुले काम करत आहेत.
प्रश्न-महिलांच्या क्षेत्रात काम करावं असं का वाटलं?
मनिष घुले-मी एका ऊसतोड कामगार कुटुंबातून आले. त्यामुळे गरिबी काय असते आणि अशा कुटुंबात महिलांना कोणकोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागतं हे सातत्याने माहित होतं. म्हणूनच मग समाजकार्याच्या माध्यमातून काहीतरी निर्माण करायचं हे जेंव्हा ठरविलं त्यावेळी आपण महिला सक्षमीकरणासाठीच काम केलं पाहिजे हे लक्षात आलं. आणि त्या दिशेने कामाला सुरूवात केली.
प्रश्न-बचतगटा निर्माण करताना कोणत्या योजनेपेक्षाही उपक्रमावर आपण भर दिला. त्यामागची प्रेरणा कोणती होती?
मनिषा घुले-योजना कोणाला नको असतात? पण योजना सर्वांना पुरेल का हा प्रश्न असतो. आज एकट्या बीड जिल्ह्याची लोकसंख्या पंचवीस लाख आहे म्हणजे सक्रीयपणे उपक्रम करू शकणार्या महिलांची संख्या किमान सहा लाखाच्या घरात आहे. आता इतक्या सर्व महिलांसाठी योजना आणणार कोठून. सरकारी योजना कितीही आल्या तरी त्या पुरणार कोणाला. म्हणूनच मग योजनांची वाट पाहत कामाची गती कमी करायची का? कोणत्याही योजनेची अपेक्षा न ठेवता आपण उपक्रम सुरू करायचे हे दोन पर्याय आमच्यासमोर होते. त्यावेळी आमच्या सर्व टीमने दुसरा पर्याय निवडायचा ठरविलं.
प्रश्न-उपक्रमशील बचतगटांना प्रतिसाद कसा होता?
मनिषा घुले-आपणच बचत करायची आणि त्यातून आपणच उद्योग उभा करायचा ही गोष्ट खेड्यापाड्यात रूजविणं तसं अवघड होतं. एकट्या मनिषा घुलेचं हे काम होतं असं नाही. पण आमची सर्व टीम यात झोकून देऊन काम करत होती. हळूहळू ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाचं महत्व पटवायचं आणि त्यांना कोणता तरी उपक्रम सुरू करून द्यायचा हे सुरू झालं. एकाचं काम पाहून दुसर्याला प्रेरणा मिळत गेली.
प्रश्न-आज घडीला किती बचतगटांच्या माध्यमातून कामं सुरू आहेत?
मनिषा घुले-आज आमचे तीन हजाराहून अधिक बचतगट आहेत. नाबार्डन आमच्या बचतगटाला सुमारे तीन कोटीचं कर्ज दिलं आहे. 17-18 प्रकारचे वेगवेगळे उद्योग या बचतगटांच्या माध्यमातून आम्ही राबवितो. यात छोटछोट्या गृहउद्योगापासून काही कुटीर उद्योगांचाही समावेश आहे. आमचे बचतगटा जी उत्पादने करतात त्याला बाजारपेठ मिळवून देणे या सर्वांना एकत्र आणणे आणि सातत्याने उपक्रमशील ठेवणे हे आम्हाला करावे लागते.
प्रश्न-हे सर्व करताना काही अडचणी आल्या का?
मनिषा घुले-अडचणी तर येतच असतात. पण या कामात महिला म्हणून आलेल्या अडचणी खूप होत्या. आम्ही बचतगटांच्या कामासाठी गावागावात जायचोत. त्यावेळी महिला म्हणून आमच्याकडे वेगळ्या भावनेने पाहिलं जायचं. यांना काही काम नाही नुसतं फिरत असतात अशी शेरेबाजी केली जायची. अनेक ठिकाणी अडवणूकही व्हायची. बचतगटांचं काम करणं म्हणजे केवळ बचतगटांपुरता मर्यादित विषय नव्हता तर एखाद्या महिलेला गावपातळीवर कोणती अडचण आली, कौटुंबिक हिंसेचा प्रकार घडला, शासकीय कार्यालयात किंवा इतर कोठे काही अन्याय होत असेल तर त्यावेळी देखील आम्ही धावून जायचो. त्यामुळे देखील अनेकांच्या मनात एकप्रकारचा राग निर्माण व्हायचा आणि त्यातून अडवणूक व्हायची.
प्रश्न-या अडचणींमध्ये कधी आपण हे सर्व सोडून द्यावं अस कधी वाटलं का?
मनिषा घुले-कधी कधी असे प्रसंग आले त्यातही या लॉकडाऊनच्या काळात एक वेगळा अनुभव आला. आम्ही काही संस्थांच्या माध्यमातून या काळात गरीब कुटुंबांना किराणा वाटण्याचं काम हाती घेतलं हे करताना गावागावात जे खरे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत धान्य पोहचत होतं. मात्र या सर्व काळात ज्यांना धान्य मिळालं नाही त्यातील काहींनी जाणीवपूर्वक आम्हाला मदत करणार्या संस्थांना पत्र पाठविले, मेल केले. आम्ही धान्य विकलं असे आमच्यावर आरोप झाले. त्यावेळी मात्र आपण हे सर्व का करत आहोत असा प्रश्न पडला. आपण महिलांसाठी, गरीबांसाठी काम करत असताना असले आरोप होतात यामुळे व्यथित व्हायला झालं होतं
.
प्रश्न-अशा मानसिकतेतून बाहेर कसा पडलात?
मनिषा घुले-आमच्याबद्दल अशी पत्रं लिहिली गेली. पण ज्या संस्थांनी आम्हाला मदत केली होती त्या संस्थांनी आमच्यावर विश्वास दाखविला. ‘आम्ही नवचेतनाला आज नाही तर बारा तेरा वर्षापासून ओळखतो’ असं उत्तर त्या संस्थांनीच दिलं. चौकशीसाठी ज्यावेळी एका महिलेला बोलाविलं गेलं त्यावेळी हजारो महिला समोर आल्या त्यामुळे काम करण्याचं बळ मिळालं. त्यासोबतच आम्ही ज्या महिलांमध्ये काम करतो त्यांच्या अडचणीतर फार मोठ्या होत्या. मग इतक्या मोठ्या अडचणी असताना एकटी एकटी महिला त्याला समोरी जाते आपण तर एक चांगली टीम तयार केली आहे. आपण हे काम करायला हरकत आहे असं नेहमी वाटत गेलं. खरं सांगायचं तर ज्या अडचणी समोर येत होत्या त्या अडचणींनी आम्हाला नवी चेतना दिली, ऊर्जा दिली.
प्रश्न-आपण नवचेतनाच्या माध्यमातून महिला अर्बन निधी देखील सुरू केला आहे त्यामागची संकल्पना काय होती?
मनिषा घुले-बचतगटाचं काम करताना बचतगटांची बँकेत खाती उघडावी लागतात. मात्र ही खाती उघडताना बँकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. हे सातत्याने अनुभवत होते. व्यवहार आपण करतो, उपक्रम राबवितो पण बँका प्रतिसाद देत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर आपणच एखादी बँक स्थापन केली पाहिजे असं वाटलं. आपल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर महिलांची पत निर्माण झाली पाहिजे आणि ही पत निर्माण करण्यासाठी बँकेच्या माध्यमाचा वापर करता येईल हे लक्षात आलं म्हणूनच नवचेतनाच्या माध्यमातून अर्बन निधीची संकल्पना समोर आली. आणि आता ते सर्व सुरू झाले आहे.
प्रश्न-भविष्यातील संकल्पना काय आहेत?
मनिषा घुले-आम्ही ज्या बचतगटांमध्ये काम करतो त्यातील बहुतांश बचतगट ऊसतोड कामगार महिलांचे आहेत. या ऊसतोड कामगार महिलांच्या हातचा कोयता सुटला पाहिजे हीच भावना आहे. महिलांना ऊस तोडणे ऐवजी बचतगटांच्या माध्यमातून उद्योग उभा करणं, या छोटछोट्या उपक्रमांना एकत्रितरित्या एका उपक्रमाचं रूप देणं हे माझं स्वप्न आहे. ग्रामीण भागातील महिलांना फार कष्ट न करता सन्मानानं तीनशे ते पाचशे रूपये रोज त्यांच्या गावात मिळाला पाहिजे यासाठीचे प्रयत्न करायचे आहेत. त्याच दिशेने नवचेतनाची वाटचाल सुरू आहे. महिला बचतगटांच्या उपक्रमांना उद्योगाचं रूप देत खेड्यापाड्यातील महिलांना उद्योजिका झाली पाहिजे ही चेतना प्रत्येकाच्या मनात निर्माण करायची आहे.