Advertisement

पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 02/04/2022
बातमी शेअर करा

बंधाऱ्या नजीक सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन तीन जण नदीत पडले व खोल पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना बीडमधील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम राबवली. बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेने वडवणी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे एका खाजगी उर्दु शाळेमध्ये शिक्षक असणाऱ्या शिक्षकाच्या मुलीचा चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगी, जावई आणि जावयाचा मित्र सासरवाडीमध्ये आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर चारच्या सुमारास ते फिरण्यासाठी बाहेर पडले. समोर असलेल्या नदीच्या पाण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मुलगी, जावई, जावयाचा मित्र आणि नात्यातील दोन लहान मुले हे नदीच्या पात्रात सेल्फी काढत असताना तोल गेला. नदीमध्ये वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ताहा शेख (20, रा.ढाकरगाव, ता.अंबड), सिद्दीकी शेख (22, रा.ढाकरगाव, ता.अंबड), शहाब (25, रा.बिहार, ह.मु.ढाकरगाव) यात तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने नातेवाईकांची दोन मुले सुखरूप वाचली आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत शोध मोहिम राबवली. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यामध्ये ग्रामस्थांना यश मिळाले. यात मयत तिघांचा मृतदेह वडवणीच्या प्राथमिक रूग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला आहे. या घटनेने वडवणी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement