बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे केंद्र सरकार राज्यांना मदत करत नसल्याची ओेरड होत असतानाच केंद्राने महाराष्ट्राला दिलेले 393 कोटीचे अनुदान खर्च करण्यात राज्य सरकारचा आरोग्य विभाग कमी पडला आहे. एप्रिल ते जून या कालावधीसाठी हे अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र यातील केवळ 143 कोटीचाच निधी खर्च झाला आहे. त्यामुळे तब्बल 145 कोटी रुपये सरकारला परत करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातून कोरोनाच्या उपाययोजनांसाठी एप्रिल ते जून या कालावधीसाठी महाराष्ट्राला केंद्राकडून 393 कोटींचे अनुदान देण्यात आले होते. या दोन महिन्यात यातील किमान 300 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित होते मात्र 8 ऑक्टोबर पर्यंत राज्याने यातील केवळ 143 कोटी रुपयेच खर्च केले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अभियान संचालकांनी सर्व जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन खर्च न केलेला निधी प्रकल्प आराखड्याच्या 30 % निधी शिल्लक ठेवून उर्वरीत तातडीने परत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता तब्बल 145 कोटी रुपये सर्व जिह्यांमधून परत केले जाणार आहेत. एकीकडे केंद्र सरकार पैसा देत नाही अशी ओरड होत असतानाच दिलेले अनुदान देखील आराखड्यानूसार वापरले जात नसल्याचे चित्र आहे.