Advertisement

परळीत चंदन चोर गजाआड

प्रजापत्र | Thursday, 24/03/2022
बातमी शेअर करा

परळी-तालुक्यातील तळेगाव शिवारात ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (दि.२३) सायंकाळी छापा मारून चंदनचोराला गजाआड केले आहे.यावेळी १२ किलो चंदन आणि इतर मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. 
        चंदन तस्करीवर आधारित ‘पुष्पा’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे असे छोटे-मोठे ‘पुष्पा’ बीड जिल्ह्यातही कार्यरत असल्याची प्रचिती बुधवारी आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी परळी ग्रामीण पोलिसांची हद्दीत गस्त सुरु होती. यावेळी तळेगाव शिवारात एक चंदनचोर शेतकऱ्यांच्या शेतातील चंदनाचे झाडे तोडून त्याचा गाभा पोत्यात भरुन तस्करी करण्यासाठी नेत असल्याची गुप्त माहिती सहा. पोलीस निरिक्षक मारोती मुंडे यांना मिळाली. मुंडे यांनी तातडीने पथक तयार करून तळेगाव शिवारात धाव घेतली आणि सायंकाळी ६.१५ वाजता छापा मारला असता कालव्या लगतच्या एका शेतात पप्पू बाबुराव सुर्यवंशी (रा. अशोकनगर, परळी) हा चंदनचोर चंदनाच्या झाडाचे खोड तासून गाभा काढत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली आणि त्याच्याकडून अंदाजे ३० हजार रुपयांचे चंदन, तराजू, वजनमापे आणि पाच वाकस असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पो.ना. नामदेव चाटे यांच्या फिर्यादीवरून पप्पू सूर्यवंशी याच्यावर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई अपर अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक मारोती मुंडे, पोलीस कर्मचारी घुगे, नामदेव चाटे, अन्नमवार यांनी पार पाडली.

 

Advertisement

Advertisement